शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’त प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्राच्या निषेधार्थ राजीनाम्याचे अस्त्र उपसणाऱ्या खासदार आणि दोन आमदारांनी राजीनामास्त्र म्यान केले आहे. बुलढाणा येथील शिवसेना खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमूलकर व आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना आज मातोश्रीवर भेटीसाठी पाचारण करण्यात आले होते. सध्या प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमूलकर व आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे नेते उद्धव यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे हेदेखील मातोश्रीच्या दिशेने रवाना झाले आहेत. मातोश्रीवर उद्धव यांच्या उपस्थितीत या सर्व नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी व्यंगचित्रावरून नाराज असलेल्या शिवसेना नेत्यांनी राजीनामा मागे घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली. मूक मोर्चासंबंधात प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त व्यंगचित्रामुळे समाजाता निर्माण झालेला रोष आम्ही उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवला. हे व्यंगचित्र काढणाऱ्या व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या वादावर पडदा टाकणे श्रेयस्कर ठरेल, अशी भूमिका या नेत्यांनी मांडली आहे.
शिवसेनेची भूमिका मराठी समाजविरोधी नाही. मराठा समाजाकडून काढण्यात येणाऱ्या मूकमोर्चांना शिवसेनेचा पाठिंबा आहे. त्यासाठी खास अधिवेशन बोलवण्याची भूमिकाही सेनेने घेतली होती. मात्र, विरोधकांकडून गैरसमज पसरवून आंदोलनाला वेगळे वळण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विरोधकांना शिवसेनेविरोधात कोणतेही हत्यार मिळत नसल्याने त्यांनी हा विषय उचलून धरला आहे. या व्यंगचित्रावरून निर्माण झालेल्या वादाच्या माध्यमातून विरोधकांकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका प्रताप जाधव यांनी व्यक्त केली.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’त प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्राच्या निषेधार्थ राजीनाम्याचे अस्त्र उपसणाऱ्या खासदार आणि दोन आमदारांना बुधवारी मातोश्रीवरून बोलावणे आले आहे. व्यंगचित्रामुळे मराठा समाजात निर्माण झालेला प्रक्षोभ पाहून बुलढाणा येथील खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमूलकर व आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी आपल्या पदांचे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मंगळवारी सादर केल्याची चर्चा होती. मात्र, शिवसेनेकडून या वृत्ताचा इन्कार करण्यात आला होता. रायमूलकर हे मेहकरचे, तर डॉ. खेडेकर हे सिंदखेडराजा येथील आमदार आहेत. हे तिघेही नेते मंगळवारी मुंबईत होते आणि त्यांनी शिवसेना मंत्र्यांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी राजीनामे सादर केले. प्रतापराव जाधव यांचे चिरंजीव ऋषी जाधव यांनी समाज माध्यमावरून याबाबत माहिती जाहीर केली होती. त्यानंतर आज या आमदारांना मातोश्रीवरून बोलावणे आल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून या आमदारांची समजूत काढली जाण्याची शक्यता आहे. या तिघांशिवाय शिवसेनेचे आणखी काही नेते राजीनाम्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. बुलढाण्यातील नगरसेवक हेमंत खेडेकर यांनी काल पदाचा राजीनामा सादर केला. अकोल्यातही शिवउद्योग आघाडीचे प्रदेश चिटणीस सुमीत पाटील आणि पंचायत समितीचे सदस्य मंगेश काळे यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.
दरम्यान, यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले असून कालपासून त्यांनी व्यंगचित्राचा मुद्दा उचलून धरला आहे. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेविरोधात जोरदार वातावरणनिर्मिती केली जात आहे.  या विरोधी लाटेमुळे सेनेकडून सध्या बचावात्मक पवित्रा स्विकारण्यात आला आहे. शिवसेना नेते  आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कालच व्यंगचित्र ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, त्यानंतरही शिवसेनेने माफी मागितल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, असे नेत्यांना वाटत आहे. यातून कसा मार्ग काढायचा, याबाबत ठाकरे यांनी काही नेत्यांशी चर्चा केली असून आज, बुधवारी पक्षाकडून भूमिका जाहीर केली जाणार असल्याचे समजते.