उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर प्रतिहल्ला

‘अच्छे दिन’च्या फसव्या घोषणांचे चित्र दाखवून विजयाचे ‘गणित’ मांडणारे आता अस्वस्थ झाले आहेत. अच्छे दिन तर दूरच राहिले, वाढती बेरोजगारी व महागाईमुळे पोळलेल्या जनतेच्या संतापाची धग जाणवू लागल्यामुळेच यांना आता ‘दोन दोन शिवसेना पक्षप्रमुख’ दिसू लागल्याचा जोरदार टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या खणखणीत विजयानंतर शिवसेनेने भाजपवर जोरदार तोंडसुख घेतले होते. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दोन पक्षप्रमुख असून एक राज्याचे आणि एक नांदेडचे असल्याचा टोला लगावला होता. तसेच सर्व विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांला चित्रकलेत पैकीच्या पैकी गुण मिळाले तर त्याचे कौतुक करायचे का, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला होता. भाजपने सव्वाशे कोटी जनतेपुढे जी फसवी चित्र‘कला’ दाखवली ती आता उघड होऊ लागली असून जनतेच्या नाराजीचा फटका त्यांना बसू लागला आहे. पंजाबमधील गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातील पराभव असो की नांदेड पालिकेत फोडाफोडीच्या राजकारणाला बसलेला झटका असो, भाजपला आता परतीच्या पावसाचा धक्का जाणवू लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावातही भाजपचा सरपंच पडला असून वारेमाप पोकळ आश्वासने आणि थापांचा बाजार आता उघडा पडत आहे. केवळ लोकच आता बोलत नाहीत तर यशवंत सिन्हांसारखे भाजपचे माजी अर्थमंत्री व ज्येष्ठ नेतेही उघड उघड नोटाबंदी, जीएसटी आणि घसरत्या अर्थव्यवस्थेवरून घरचा ‘आहेर’ देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. गुजरातच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आज ‘गुजरात मॉडेल’ गुजराती लोकांनाच समजून सांगायला चौदा राज्याचे मुख्यमंत्री तेथे प्रचाराला जाणार असतील तर ‘विकास’ केवळ ‘गांडो’च नव्हे तर खरोखरच घाबरला आहे, असेच म्हणावे लागेल, असा टोलाही उद्धव यांनी लगावला.

जागतिक भूक निर्देशांकाची माहिती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. त्यात स्पष्टपणे नमूद केले आहे की २०१४ साली जो भारत ५५व्या क्रमांकावर होता तो अवघ्या तीन वर्षांत २०१७ मध्ये १००व्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. विकासाचे खोटे चित्र रंगविणाऱ्यांनी भुकेवरही आता बोलावे म्हणजे त्यांचा खरा चेहरा लोकांपुढे येईल. दोन शिवसेनाप्रमुख अशी टीका करणाऱ्यांनी भाजपचा ‘मुखवटा आणि चेहरा’ यावरही भाष्य केले तर बरे होईल, असेही उद्धव म्हणाले.