मुख्यमंत्र्यांच्या स्नेहभोजनानंतरही उद्धव ठाकरेंची तोफ

जनमानसाला भुरळ घालणारी आश्वासने देऊन प्रत्यक्षात काहीही न करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हल्लाबोल केला असल्याने भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. शिवसेना केंद्रात व राज्यात सत्तेत सहभागी असूनही भाजपच्या ‘दिल्लीश्वरांशी’ संवाद तुटलेला आहे, असे ‘मनोगत’ व्यक्त करुन पंतप्रधान मोदी व अध्यक्ष अमित शहा शिवसेनेला किंमत देत नसल्याबद्दल ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुसंवाद राखण्यासाठी ‘मातोश्री’ वर जाऊन ठाकरे यांच्यासमवेत स्नेहभोजन घेऊनही भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वावर हल्ला चढविला गेल्याने आणि ज्येष्ठ नेत्यांकडून मौन पाळले जात असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे.

भाजपची सत्ता आल्यास हिंदूमार खाणार नाही, महागाईला आळा घालू, विदेशातील काळा पैसा परत आणून गोरगरिबांच्या बँक खात्यात जमा करु, अशा वल्गना मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारात केल्या. त्यादृष्टीने काहीही प्रत्यक्षात झालेले नसून सरकारने महागाईला आळा घातलेला नाही, रोजगारनिर्मिती व उद्योग वाढलेले नाहीत. मोदी सरकारला दोन वर्षे उलटूनही ‘जैसे थे’ स्थिती असल्याने केवळ जाहिरातबाजीवर देश चालणार नाही, असे खडे बोल ठाकरे यांनी मोदींना सुनावले आहेत.

शहांकडून दखल?

शिवसेना केंद्रात व राज्यात सत्तेत सहभागी असताना ठाकरे यांनी हल्लाबोल केल्याने भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गंभीर दखल घेतली असून राज्यातील ज्येष्ठ नेत्यांकडून याबाबत तपशील मागविला आहे. काही ज्येष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चा केल्याचेही समजते. मोदींशी चर्चा केल्यावर शिवसेनेबाबत कोणती भूमिका घ्यायची व कोणत्या नेत्यांनी प्रत्युत्तर द्यायचे, याचा निर्णय अमित शहा घेणार आहेत.  मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशीही शहा यांची चर्चा होत आहे.