उद्धव ठाकरे यांचे नरेंद्र मोदींवर पुन्हा शरसंधान; भाजपचे दुर्लक्ष

नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर शरसंधान केले असून ‘टोकाची भूमिका घेण्यास मी मागेपुढे बघणार नाही’ असा इशारा दिला आहे. शिवसेना राज्यात व केंद्रातील सरकारमधून बाहेर पडू शकते, असा गर्भितार्थ यातून निघत असला तरी शिवसेना तशी हिंमत दाखविण्याची शक्यता भाजपला वाटत नसल्याने अशा पोकळ इशाऱ्यांकडे गांभीर्याने न पाहण्याची भूमिका भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. तर नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला जनतेचा पाठिंबा असून शिवसेनेचा विरोध कोणासाठी व कोणत्या त्रासासाठी सुरु आहे, हे कळत नाही, असा सणसणीत टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना लगावला.

नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरुन शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत जनतेचे हाल होत असल्याबद्दल मोदी यांना धारेवर धरले आहे. ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटप्रमाणे जनमत चाचणी घेतली जात आहे. पण जनतेचा कौल पाहून तेथे राष्ट्राध्यक्ष पायउतार झाले, त्याप्रमाणे जनतेने तसा कौल दिल्यास मोदी सत्ता सोडणार का, असा खणखणीत सवाल ठाकरे यांनी विचारला आहे. ‘वर गेल्यावर शिवसेनाप्रमुखांना कसे तोंड दाखविणार,’ असा खरमरीत सवाल विचारुन मोदी यांनी शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाची पंचाईत केली होती. त्यामुळे शिवसेनेने आता मोदींविरोधात पुन्हा तोफ डागून ‘टोकाची भूमिका घेण्यास भाग पाडू नका,’ असा पाठिंबा काढून घेण्याचा गर्भित इशाराच दिला असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

माजी पंतप्रधान मनमोहनसिंह हे सुप्रसिध्द अर्थतज्ज्ञ असून त्यांचे मत गांभीर्याने घ्यावेच लागेल, असे सांगून काळा पैसा खणून काढताना पंतप्रधानांच्याच मनात काही काळेबेरे आहे का, अशी शंका ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. जनतेच्या डोळ्यात अश्रू असताना भावूक होण्यात काय अर्थ आहे, अशी टिप्पणी मोदी यांच्यावर करीत ठाकरे यांनी ‘सव्वाशे कोटी जनतेचा निर्णय एक व्यक्ती घेऊ शकत नाही, जनतेला विश्वासात घेणे आवश्यक होते, ’ असा टोला लगावला आहे. सामान्यांकडून खंडणीसारखा पैसा गोळा करण्यात येत असून जनतेने विश्वासाने निवडून आणले, त्यांच्या डोळ्यात तुम्ही अश्रू आणले आहेत, अशी टिप्पणी ठाकरे यांनी केली.

जिल्हा बँकांवर असलेल्या र्निबधांविरोधात बोलताना ठाकरे यांनी ‘ परदेशात पळून गेलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांनी कोणत्या जिल्हा बँकेचे कर्ज घेतले होते, असा खोचक सवाल उपस्थित केला. त्यांनी ज्या बँकेकडून कर्ज काढून ते पळून गेले, त्यांच्या बँकेला मात्र नोटा बदलण्याची परवानगी कशी, अशी विचारणा ठाकरे यांनी केली आहे.

भाजपकडून फारशी दखल नाही

टोकाचा निर्णय घेण्याचा गर्भित इशारा ठाकरे यांनी दिला असला तरी शिवसेना केंद्र व राज्य सरकारचा पाठिंबा काढण्याची किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याची कोणतीही शक्यता भाजपला वाटत नाही. ठाकरे यांच्या वक्तव्यांकडे फारसे गांभीर्याने पाहण्याची गरज नसल्याची भूमिका भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. नोटा रद्द करण्याच्या निर्णयाला जनतेने पाठिंबा दिला आहे. मोदी यांना पाठिंबा दिला असून अडचणी सोसण्याची जनतेची तयारी आहे. तसा स्पष्ट कौल जनतेने दिला आहे. ममता बॅनर्जी व सहकाऱ्यांचा विरोध चीट फंड व अन्य गैरव्यवहारांवरुन आहे. मुलायमसिंह व मायावती यांचा आरडाओरडा का सुरु आहे, हे सर्वाना माहीत आहे. मोदी यांचा निर्णय जन व देशहिताचा असल्याची जनतेची खात्री असून शिवसेना कोणत्या त्रासाबद्दल बोलत आहे, हे समजत नसल्याचे भाजपचे मुख्य प्रवक्ते भांडारी यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेने ठाम भूमिका घ्यावी – शेलार

ठाणे : शिवसेनेने आधी काळ्या पैशांबाबत ठाम भूमिका घ्यावी. तसेच शिवसेना काळ्या पैशांच्या बाजूने असेल तर जनताच त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देईल आणि काळ्या पैशांविरोधात असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे प्रतिउत्तर भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी गुरुवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिले. तसेच आमचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने गैरसमज करू नये आणि गैरसमज पसरवू नये, असा सल्लाही दिला.