भारत हे हिंदू राष्ट्रच आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही कायम हीच भूमिका होती, असे प्रतिपादन करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मतप्रदर्शनाचे समर्थनच केले.
भागवत यांच्या मतप्रदर्शनात चुकीचे काहीच नाही. हिंदूुत्व हीच देशाची ओळख असून ते इतर धर्मीयांना सामावून घेऊ शकते, असे ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
पाकिस्तानशी होणारी बोलणी रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविषयी विचारता पाकिस्तानबरोबरच्या संबंधांबाबत गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. पाकिस्तानशी मैत्री होऊ शकत नाही, कठोरपणे निर्णय घेतला गेला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
नियोजन आयोग रद्द करून नवीन यंत्रणा स्थापन करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले असून त्यावर मुख्यमंत्री चव्हाण यांनी जोरदार टीका केली आहे. त्यावर नियोजन आयोगाचे महत्त्व काय व तो किती उपयुक्त ठरला, हे मुख्यमंत्र्यांनी आधी सांगावे, असे प्रतिआव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
हे भागवतांचे  वैयक्तिक मत-रामदास आठवले
भारत हे हिंदू राष्ट्र आहे, या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सावध प्रतिक्रिया दिली. भागवत यांचे ते वैयक्तिक मत आहे, एनडीए सरकारची ती भूमिका नाही, असे त्यांनी सांगितले.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मंगळवारी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना आठवले यांनी संविधानात सर्वधर्म समभावाचे तत्व आहे, त्याचेच पालन एनडीए सरकार करील, असा दावा केला. भारत हे हिंदुराष्ट्र आहे, हे मोहन भागवत यांचे वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी म्हटले. विधघानसभा निवडणुकीत महायुतीकडे रिपाइंने ५९ जागा मागितल्या आहेत. त्यापैंेकी २० तरी जागा मिळाल्याच पाहिजेत, असा आग्रह त्यांनी धरला. शिवेसना किंवा भाजपच्या चिन्हावर आमचे उमेदवार लढणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.