उद्धव यांचा इशारा; सरकार संरक्षण करण्यास समर्थ नसेल, तर शस्त्र हाती घ्यावे लागेल
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आणि विधानसभेवरही शिवसेनेचा भगवाच फडकणार, असा विश्वास व्यक्त करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता पाकिस्तानशी चर्चा करण्याच्या धोरणावरुन टीकेची झोड उठविली. सरकार संरक्षण करण्यास समर्थ नसेल, तर आपल्याला शस्त्र हाती घ्यावे लागेल. अन्यथा वाघ म्हणवून घेण्यात काहीच अर्थ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानचा बदला घेण्याची नुसती भाषा करुन केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरु असल्याबद्दल ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने षण्मुखानंद सभागृहात शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ठाकरे केंद्र सरकारवर आणि मुंबई महापालिकेत सत्ता मिळविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपवर टीकास्त्र सोडले. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आगामी निवडणुकीत महापालिकेत भाजपची सत्ता येईल, असा दावा नुकताच केला होता. त्याचा संदर्भ देत महापालिकेत सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या नेत्यांना इशारा दिला. ‘दिल्ली, बिहारमध्येही झेंडा फडकविण्याची स्वप्ने पाहिली होती. त्याचे काय झाले, असा सवाल करीत ठाकरे यांनी ‘इकडे फडफड करु नका. मुंबईत गल्लीबोळात शिवसेना कार्यकर्ते असून मुंबईकरांच्या अडचणीच्या काळात धावून जातात. १९९२-९३ तील दंगलींच्या वेळी शिवसेनेने मुंबई वाचविली, असे सांगून सेल्फी काढताना समुद्रात पडलेल्या मुलींना वाचविताना मृत्यूमुखी पडलेल्या रमेश वळंजूची आठवण सांगितली. तो शिवसेनेचा पदाधिकारी होता. बुडणाऱ्या मुली िहदू की मुस्लिम, मराठी की अमराठी असा विचार शिवसेना कार्यकर्ता कधीही करीत नाही. हेच हिंदूुत्व व राष्ट्रीयत्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इसिसचे जाळे राज्यभरात वाढत आहे. मग आपण काय ईदचे बकरे बनायचे, असा सवाल ठाकरे यांनी केला. सरकार संरक्षण करायला समर्थ नसेल, तर आता शस्त्र उचलावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. पठाणकोटसारख्या दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडतच आहेत आणि संरक्षणमंत्री केवळ बदला घेऊ, अशी भाषा करीत आहेत. पण प्रत्यक्षात काहीच होत नसल्याने संताप व्यक्त करताना पाकिस्तानशी चर्चेचे गुऱ्हाळ लावून बदला घ्यायचा आहे का, अशी खिल्ली उडविली. शेंडी-जानव्याचे हिंदूत्व नको आणि देवळात घंटा बडविणारा नाही, तर अतिरेक्यांना बडविणारा हिंदू हवा, असे सांगितले,

उद्धव यांनी माझ्या हाती रिमोट सोपवला -फडणवीस
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा रिमोट कंट्रोल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हाती दिला असला तरी राज्यातील युती सरकारचा रिमोट कंट्रोल ठाकरे यांनी माझ्या हातात दिला आहे. त्यामुळे सरकार चालविताना मंत्र्यांनी संकेत पाळलेच पाहिजेत, असा चिमटा काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना अप्रत्यक्षपणे ठणकावले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्रमकपणे सरकारविरोधात काही वक्तव्ये केल्याच्या आणि नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेल्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीतच शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावले. शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानित्ताने एसटीने व परिवहन विभागाने सुरू केलेल्या योजनांचा आरंभ मुंबई सेंट्रल येथील आगारात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी टोलेबाजी केली. शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी सुरू करण्यात येत असलेल्या योजनांबद्दल उद्धव ठाकरे यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे अभिनंदन केले. भगवा गावागावात न्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यातील घटनेवर मौन का?
दादरीच्या घटनेचे मी समर्थन करणार नाही. पण पुण्यात एका तरुणाची िहदू असल्याने हत्या करण्यात आली. मग त्याचा निषेध कोणी केला. हिंदूूंची संख्या मोठी असल्याने त्याच्या मरण्याचे कोणालाही सोयरसुतक नसल्याचे सांगून त्यांनी खंत व्यक्त केली.