मुख्यमंत्र्यांसमक्षच उद्धव ठाकरे यांची टिप्पणी

‘‘बाळासाहेबांनंतर शिवसेनेचे काय होईल, असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु, बाळासाहेबांनी हिरे-माणकापेक्षा अनमोल अशी माणस उभी केली होती. या माणसांनी शिवसेनेसाठी रक्ताचे पाणी केले. त्यांच्या साथीने शिवसेनेची आज भक्कम वाटचाल सुरु आहे. शिवसेनेचा बाण हा कधीही तिरका जात नाही तर सरळ जाऊन भेद करतो, अशी टिप्पणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली.

मुंबई महापालिका निवडणुकीत गोरेगाव येथील नेस्को संकुलातच भाजपबरोबरील युतीचा कटोरा फेकून देत असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेची सद्दी संपविण्याची भाषा केली होती. रविवारी शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त याच नेस्को संकुलात उद्धव व मुख्यमंत्री फडणवीस एका व्यासपीठावर आले. सुभाष देसाई यांचा जीवनपट उलगडणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी झाले. या कार्यक्रमात बोलताना उद्धव यांनी शिवसेना हे एका कुटुंबासारखे असून शिवसेना व भाजपमध्ये नेते हे वरून लादले जात नाहीत तर कष्टाने घडतात असे सांगितले. सुभाष देसाई यांच्या कामाचा उत्साह पाहिला की त्यांच्या वयाचा दाखला तपासून पाहावेसे वाटते असे सांगत तुमच्यासारख्या वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन यापुढेही मला मिळत राहो, असेही ठाकरे म्हणाले. ‘‘ज्यावेळी लोक हिंदुत्वाचे नाव घ्यायला घाबरत होती त्यावेळी बाळासाहेबांनी ‘सामना’ दैनिक काढून हिंदुत्वाचा लढा उभारला. या दैनिकाच्या उभारणीपासून सुभाष देसाई यांचा मोलाचा वाटा होता ’’असेही ते म्हणाले.

देसाई यांचे वय ७५ असले तरी त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. उद्योगमंत्री म्हणून ‘मेक इन महाराष्ट्र’ कार्यक्रमात त्यांनी मोठे काम केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. उद्योजकांना कोणताही त्रस न होता देसाई यांनी अनेक उपक्रम राबविल्याचेही त्यांनी सांगितले. ‘सामना’च्या वाटचालीत त्यांचे मोलाचे योगदान असून त्यांनीही अधूनमधून ‘रोखठोक’ लिहावे, असा मार्मिक टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यात आनंद-देसाई

उद्योगमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी मला कायम सहकार्य केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यात एक वेगळाच आनंद असल्याचे सुभाष देसाई यांनी या वेळी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या दगडाला शेंदूर फासला तो देव झाला. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता त्यांच्यामुळेच नेता होऊ शकला, असेही देसाई म्हणाले.