शिवसेना भवनाखाली सकाळपासून वाहनांची रीघ सुरू झाली. आमदार, खासदार व नेते सेनाभवनात दाखल होऊ लागले. बाहेर मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. निमित्त होते शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून होणाऱ्या निवडीचे.. सर्व नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेली ही निवड जरी औपचारिक असली तरी निवड होताच शिवसेनाभवनाखाली एकच जल्लोष झाला. आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्रालयावर भगवा फडकविण्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला, आणि सेनेच्या कार्याकर्त्यांनी जोरदार घोषणा देत त्याला साध दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेनाभवनात शिवसेना प्रतिनिधीसभा आयोजित करण्यात आली होती. सेनेच्या घटनेनुसार दर पाच वर्षांनी अशी सभा होत असते. आजच्या सभेत एकूण सहा घटनादुरुस्ती करण्यात आल्या. यात ‘शिवसेनाप्रमुख’ व कार्याध्यक्षपद गोठविण्यात आले तर शिवसेना पक्षप्रमुख हे नवे पद निर्माण करण्यात आले. सेना नेते रामदास कदम यांनी पक्षप्रमुखपदाची सूचना मांडली तर गजानन किर्तीकर यांनी अनुमोदन दिले.
शिवसेनेत नेते, उपनेते तसेच अन्य पदांची नियुक्ती तसेच ही पदे रद्द करण्याचे सर्वअधिकार पक्षप्रमुखांना बहाल करण्यात आले. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेचा पक्षाची अंगीकृत संघटना म्हणून समावेश करण्यात आला. राम जेठमलानी यांनी भाजपत अध्यक्षपदासाठी जसा प्रश्न उपस्थित केला तसा उद्या कोणी करेल म्हणून आत्ताच विचारतो पक्षप्रमुखपदासाठी आणखी कोणी इच्छुक आहे का, असा सवाल उद्धव यांनी केला, आणि उपस्थितांनी उद्धव यांच्या निवडीला एकमुखाने पाठिंबा दिला. छोटे-मोठे मतभेद मिटवून एकजुटीने उभे राहा, असे आवाहन उद्ध़व यांनी यावेळी केले. उद्धव यांच्या निवडीची घोषणा शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते सुभाष देसाई व खासदार संजय राऊत यांनी पत्रकर परिषदेत केली.