शेतकऱ्यांनी मोठय़ा विश्वासाने तुम्हाला सत्तेवर बसविले असून त्यांचा गळा घोटण्याचे पाप करु नका, असे ठणकावत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नवीन केंद्रीय भूसंपादन कायद्यातील तरतुदींना विरोध केला आहे. नवीन तरतुदी शेतकऱ्यांच्या हिताविरोधी असल्याने त्याला मोठा विरोध होत असून रालोआतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेनेही विरोधी भूमिका घेतल्याने केंद्र सरकारची पंचाईत झाली आहे. राज्यात आणि केंद्रात अनेक मुद्दय़ांवर शिवसेना-भाजपमध्ये जाहीर मतभेद होत असताना आता भूसंपादन कायद्यावरुनही आणखी ठिणगी पडली आहे.
प्रस्तावित केंद्रीय भूसंपादन कायद्याबाबत शिवसेनेची भूमिका ठाकरे यांनी मांडली आहे.  शिवसेना उद्योग व आर्थिक विकासाला कधीही विरोध करणार नाही. पण त्यांच्या जमिनीचा जबरदस्तीने बळी देऊन हा विकास होणार असेल तर नव्या कायद्याचा पुनर्विचार करावाच लागेल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहिली आहे.
त्यामुळे त्यांच्याहिताविरोधी कोणत्याही कायद्याला पाठिंबा दिला जाणार नाही, असे ठाकरे यांनी ठणकावले आहे.