शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे ३ डिसेंबरपासून राज्याच्या दौऱ्यावर निघत आहेत. शिवसेनाप्रमुखांवर अपार प्रेम दाखविणाऱ्या शिवसैनिकांविषयी कृतज्ञता दाखविण्यासाठी हा दौरा असल्याचे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. या दौऱ्यानंतर जानेवारीपासून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज्याच्या विविध प्रश्नांसंदर्भात दौरा करणार आहेत.
शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांना तसेच नेत्यांना भेटणे उद्धव ठाकरे यांना शक्य झाले नव्हते. तसेच अनेक शिवसैनिकांनाही मुंबईत येता आले नव्हते. या सर्व शिवसैनिकांना भेटण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुंबई, कोकण, रायगड, सिंधुदुर्ग, मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण राज्यभरात उद्धव यांचा १५ दिवसांचा दौरा आहे. या दौऱ्यानंतर पुन्हा जानेवारीमध्ये पक्षबांधणीसाठी तसेच राज्य शासनाच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी उद्धव राज्यव्यापी दौरा करणार आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या, विजेचे प्रश्न, महागाई आदी अनेक मुद्दय़ांवरून राज्यात रण पेटविण्यात येणार असल्याचे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.