उद्धव ठाकरे यांचा नरेंद्र मोदी यांना टोला; महापालिकेचे कौतुक

महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा काँग्रेस सरकारने घाट घातला होता. त्या वेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली. त्या वेळी पं. जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. त्यांनीही मुंबई महाराष्ट्राला मिळू न देण्याचा चंग बांधला होता. सगळेच पंतप्रधान असे असतात की काय, असा टोला हाणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

कुलाबा येथे पालिकेतर्फे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत असून या केंद्राचे भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

[jwplayer zkvFlBpu-1o30kmL6]

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठा संघर्ष करून महाराष्ट्राने मुंबई मिळविली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ २१ नोव्हेंबर रोजी सुरू झाली होती. हा इतिहास विसरून चालणार नाही. त्या वेळी पं. नेहरू पंतप्रधान होते. ते आपल्याच मस्तीत होते. मुंबई महाराष्ट्राला मिळू न देता केंद्रशासित करण्याचा त्यांचा इरादा होता. त्यामुळे चवताळून उठलेल्या मराठी बांधवांनी पं. नेहरू यांना वठणीवर आणले. सगळेच पंतप्रधान असेच असतात की काय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आम्ही तुमच्या वाटय़ाला जाणार नाही आणि तुम्हीही आमच्या वाटय़ाला जाऊ नये, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी या वेळी भाजपला दिला.

नोटाबंदीमुळे सध्या नागरिकांना पैशांची चणचण भासत आहे. तशी चणचण मुंबईकरांना पाण्यासाठी भासली नाही. केवळ महापालिकेने केलेल्या कामामुळेच ते शक्य झाले, अशा शब्दांत त्यांनी पालिकेचे कौतुक केले.

मोकळे भूखंड दिसले, की परवडणारी घरे बांधण्याची भाषा केली जाते; पण ही घरे नेमकी कोणाला परवडणार आहेत, असा सवाल करीत ते म्हणाले की, ही केवळ शब्दांची चलाखी आहे.

भाजप नेत्यांची अनुपस्थिती

सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमाबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असून त्यांनीच हा कार्यक्रम उरकून घ्यावा, असे सांगितल्याचे उद्धव ठाकरे यांनी या वेळी स्पष्ट केले. मात्र या कार्यक्रमाला भाजपचा एकही नगरसेवक उपस्थित नव्हता. एरवी मुख्यमंत्री नसतानाही पालिकेच्या कार्यक्रमास भाजपचे नगरसेवक आवर्जून उपस्थित राहात होते. मात्र या कार्यक्रमाकडे भाजप नगरसेवकांनी पाठ फिरविल्याची चर्चा या वेळी सुरू होती.

मोदींच्या दहशतीने भाजप खासदार गप्प -खैरे

नोटाबंदीवरून भाजप खासदारांमध्येही अस्वस्थता आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहशतीमुळे ते बोलू शकत नाही. आपल्याला बाजूला ढकलण्याची भीती त्यांना वाटत आहे, असा दावा शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सोमवारी केला. मोदींनी विश्वासार्हता गमाविल्याचा आरोपही त्यांनी केला.

[jwplayer OnydZc5l-1o30kmL6]