पेंग्विनच्या मृत्यूवर शिवसेनेवर टीकास्त्र सोडणा-या मनसेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. पेंग्विनपेक्षा पक्षाची काळजी करा असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. पनवती लोकांकडूनच पेंग्विनवर टीका सुरु होती असे त्यांनी म्हटले आहे.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात दक्षिण कोरियातून आणलेल्या आठ पेंग्विनपैकी एका पेंग्विनचा रविवारी सकाळी मृत्यू झाला होता. राजकीय हट्टापायी लाखो रुपये खर्चून आणलेल्या पेंग्विनचा मृत्यू झाल्याने टीकाही सुरु झाली. बाल हट्टापायी पेंग्विन आणल्याने त्याचा मृत्यू झाला. आता उर्वरित पेंग्विनतरी पाठवावेत अशी मागणी मनसेने केली होती. मनसेच्या या टीकेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पेंग्विनवरुन टीका करणा-यांनी आधी स्वतःचा पक्ष सांभाळावा असा टोला उद्धव ठाकरे यांनी मनसेला लगावला आहे.  पेंग्विनची काळजी आम्ही करु, पण त्यांनी आधी स्वतःच्या पक्षाची काळजी करावा कारण तो पक्ष आता संपण्याच्या मार्गावर आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी मनसेचे नाव न घेता लगावला आहे. पेंग्विनच्या मृत्यूवरुन काँग्रेस आमदार नितेश राणे यांनीदेखील बालहट्टामुळे एका पेंग्विनने जीव गमावला अशी टीका केली आहे. महापालिकेने २५ जुलैरोजी दक्षिण कोरियातील सेऊलमधील आठ हम्बोल्ट पेंग्विन आणले होते. या  पेंग्विनच्या खरेदीसाठी पालिकेने सुमारे ३ कोटी रुपये मोजले होते. याशिवाय त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेले १७०० चौरस फुटांचे शीतघर, २५० चौरस फुटांचे विशेष संरक्षित क्षेत्र, तापमान नियंत्रण, तलाव तसेच पेंग्विनची पाच वर्षे देखभाल व निगा या सगळ्यासाठी तब्बल ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

रविवारी यातील एका पेंग्विनचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू संसर्गामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुरुवातीच्या काळात अशी घटना घडू शकते, मात्र पुन्हा अशी घटना घडल्यास त्यांच्या देखभालीसंदर्भात प्रश्नचिन्ह उभे राहील, असे प्राणीसंग्रहालयाच्या एका माजी संचालकांनी सांगितले आहे. त्यामुळे पेंग्विनसाठी आता महापालिकेला सर्तक राहण्याची गरज आहे.