महाराष्ट्र दिनी काळा दिन साजरा करण्याचे आवाहन करणाऱ्या श्रीहरी अणे यांना लक्ष्य करत आंदोलनाची भाषा करणाऱ्या व्यक्ती, ज्या आईच्या कुशीतून जन्माला आले, त्या कुशीवर वार करणाऱ्या दळभद्री औलाद असल्याची जळजळीत उद्धव ठाकरे यांनी केली. उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदर्श इमारत पाडण्याच्या आणि महाराष्ट्र दिनाबाबत श्रीहरी अणे यांनी आंदोलनाच्या दिलेल्या हाकेवर भाष्य केले. महाराष्ट्र दिनी अशाप्रकारे आंदोलनाची भाषा करणे दुर्दैवी असल्याचे उद्धव यांनी म्हटले.
विदर्भाचा केक कापून अणेंचे राज यांना प्रत्युत्तर
राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी रविवार १ मे रोजी साजरा होणारा महाराष्ट्र दिन विदर्भवादी नेत्यांनी काळा दिवस म्हणून साजरा करत काळे झेंडे फडकवावेत असे आवाहन केले आहे. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून यापुढे आमच्यावर हल्ला झाला तर प्रतिकार करू, शांत बसणार नाही, असा इशारा अणेंनी काल झालेल्या पत्रकारपरिषदेत दिला होता. मी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरें यांच्यासोबत चर्चा करून त्यांना वेगळ्या विदर्भाचे महत्त्व पटवून द्यायला तयार आहे. यासंदर्भात मी बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही चर्चा केली होती. त्यावेळी बाळासाहेबांनी आम्ही विदर्भाचा विकास करू शकलो नाही तर स्वत:हून विदर्भ स्वतंत्र करू, असे आश्वासन दिल्याचेही अणेंनी पत्रकारपरिषदेत सांगितले होते.