महाराष्ट्र स्थिर ठेवण्यासाठी शिवसेनेची गरज होती, त्यामुळे आम्ही तडजोड केली, पण शिवसेनेने शेपूट घातले, असा समज करून घेऊ नका, असा सज्जड इशाराच उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. सरकारमध्ये आहोत म्हणून आम्ही शांत बसणार नाही. प्रसंगी सरकारशी संघर्ष करू, अशीही गर्जना त्यांनी केली.
उद्धव यांच्या या वक्तव्यावर भाजपमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून शिवसेना-भाजपमधील धुमसणारा विसंवाद यानिमित्ताने चव्हाटय़ावर आल्याचे मानले जात आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी षण्मुखानंद सभागृहात झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चौफेर टोलेबाजी केली. गेले काही दिवस खदखदणारी नाराजी उद्धव यांच्या वक्तव्यातून बाहेर पडली. आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याचे संकेत उभय पक्षांत सुरू झाल्याचे यातून मिळत आहेत. शिवसैनिक हे कोणत्याही लाटेवर तरंगणारे ओंडके नाहीत, असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.
हिंदुत्ववादी संघटनांनी सुरू केलेल्या घर वापसी, चार मुले आदी मोहिमांवरही त्यांनी कोरडे ओढले. काश्मीरमधील विस्थापित पंडितांची घर वापसी कधी होणार, असा सवाल करीत त्यांनी मोदी सरकारवरही शरसंधान केले.  स्वबळावर शिवसेनेच्या ६३ जागा आल्या, ही लहानसहान गोष्ट नाही, असे सांगून ते पुढे म्हणाले, की हिंदूंना वाली कोण, हा प्रश्न असेल तर हिंदूंनी जीव दिलेला बरा.
बाळासाहेबांचे स्मारक सन्माकपूर्वकच उभारले गेले पाहिजे, त्यासाठी कोणाचेही उंबरठे झिजविणार नाही, असेही उद्धव या वेळी म्हणाले. सरकारच्या योजनांची अंमलबजावणी होते किंवा नाही, यावर शिवसैनिकांची नजर राहील, असा इशारा देऊन प्रसंगी सरकारविरोधात उभे राहू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

हिंदुत्ववाद्यांची खिल्ली
चार मुले जन्माला घाला, असे सांगितले जाते, पण ती पोसणार कोण, असा सवाल करीत उद्धव यांनी हिंदुत्ववादी नेत्यांच्या वक्तव्यांची खिल्ली उडविली. कोणतेही अस्तित्व संख्येवरून मोजू नये, तर बळावरून मोजले पाहिजे. एक मुलगा असला तरी चालेल, तो वाघासारखा असावा, असेही ते म्हणाले.

एकनाथ खडसेंचा टोला
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सरकार स्थिर ठेवण्यासाठी सत्तेत सहभागी होण्याची गरज नसते, असा टोला खडसे यांनी मारला आहे.

उद्धव उवाच
*स्वबळावर शिवसेनेच्या ६३ जागा आल्या, ही लहान गोष्ट नाही.
*हिंदूंना वाली कोण, हा प्रश्न असेल तर हिंदूंनी जीव दिलेला बरा!
*अन्यायाचा प्रतिकार ही तर विधायक हिंसा
*बाळासाहेबांच्या स्मारकासाठी कोणाचेही उंबरठे झिजविणार नाही. स्मारक सन्मानपूर्वकच झाले पाहिजे.
*सरकारमध्ये आहोत म्हणून आम्ही शांत बसणार नाही. सरकारच्या अन्यायावर पहिला वार आम्ही करू!
*काही लोक आता दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी भेटीगाठी घेत आहेत.