बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर रिक्त झालेले ‘शिवसेनाप्रमुख’पद उद्धव ठाकरे हे स्वीकारणार का, असा प्रश्न शिवसैनिकांसह राजकीय वर्तुळात सध्या चर्चिला जात आहे. मात्र शिवसैनिकांनी मोठय़ा आदराने बाळासाहेबांना दिलेले ‘शिवसेनाप्रमुख’ हे पद घटनात्मक नसल्याने उद्धव ठाकरे हे कार्यकारीप्रमुखच राहतील, असे शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.
शिवसेनेमध्ये शिवसेनाप्रमुखपद असे कोणतेही घटनात्मक पद नाही. घटनेनुसार कार्याध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस अशी अनेक पदे आहेत. बाळासाहेब हे शिवसैनिकांचे सर्वस्व होते व त्यांनीच त्यांना शिवसेनाप्रमुखपदी विराजमान केले होते. बाळासाहेब व शिवसैनिकांमध्ये एक अतूट विश्वासाचे नाते असल्यामुळे उद्धव ठाकरे हे या नात्याचा सन्मान राखून शिवसेनाप्रमुखपदाचा स्वीकार करणार नाहीत, असे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना कार्याध्यक्षपदी असून त्यांनी शिवसेनाप्रमुखपद स्वीकारल्यास कार्याध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार, असा सवालही सेनेतून उपस्थित होत आहे. सेनेतीलच काही पदाधिकाऱ्यांच्या व शिवसैनिकांच्या मताचा आढावा घेतला असता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखपद स्वीकारण्यात काहीही गैर नसल्याचे मानणाराही एक वर्ग असल्याचे दिसून आले. शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी आता उद्धव यांच्यावर असून त्यांनी कार्याध्यक्ष व शिवसेनाप्रमुख अशी दोन्हीही पदे स्वत:कडे राखल्यास पक्षाच्या दृष्टीने चांगले असेल, असे सेनेच्या एका ज्येष्ठ आमदाराने सांगितले.  गेल्या एक दशकाहून अधिक काळ उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या संघटनात्मक बांधणीची जबाबदारी पेलली, एवढेच नव्हे तर नारायण राणे व राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतरही मुंबई, ठाणे व कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला विजय मिळवून दिला होता, त्यामुळे त्यांनी दोन्ही जबाबदाऱ्या स्वीकारणे योग्य ठरेल, असेही मत सेनेतील काही आमदारांनी व्यक्त केले. ‘जसे मला तुम्ही सांभाळले व मी तुम्हाला सांभाळले, तसेच उद्धव व आदित्यला सांभाळा’ हे दसरा मेळाव्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले आवाहनही मोलाचे आहे. ‘इमान जपा’ या शिवसैनिकांना दिलेल्या आदेशाचाही शिवसेनाप्रमुखपदाचा विचार करताना व्हावा, अशी भूमिका सेनेच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी मांडली.