विकास आराखडा मुंबईकरांवर अन्याय करणारा असेल, तर तो केराच्या टोपलीत टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिला. विकास आराखड्याचा अभ्यास करण्यासाठी शिवसेना नगरसेवक आणि तज्ज्ञांची बैठक मंगळवारी मुंबईत झाली. त्यानंतर त्यांनी आराखड्याबाबतची मते मांडली.
ते म्हणाले, आराखड्यात काय आहे. त्यापद्धतीने विकास केला तर काय होईल. कोणाकोणाला याचे फटके बसतील, याचा अभ्यास आम्ही करतो आहोत. पुढील काळातही हा अभ्यास करण्यात येणार आहे. सध्यातरी या आराखड्याप्रमाणे विकास झाला तर मुंबईत एफएसआयचे जंगल होईल, असे दिसते. मात्र, यातील घरे सर्वसामान्यांना परवडणार नाहीत. त्यामुळे या सगळ्यावर आम्ही जनतेकडून सूचना मागविणार आहोत. त्या आल्यावर हा आरखडा स्वीकारायचा की केराच्या टोपलीत टाकायचा हे निश्चित करू. मुंबईकरांवर अन्याय करणारा आराखडा आम्ही केराच्या टोपलीतच टाकू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपण विकासाचे विरोधक नसल्याचे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, विकासामुळे काय जाणार आहे, याचासुद्धा विचार केला पाहिजे.