शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना लायकी नसताना ‘सुपा’एवढे दिले, ते बाळासाहेबांना पाठवलेल्या एका चिकन सूपचे बिल जाहीर सभांमधून फडकवतात, हा निलाजरेपणाच नाही का?, असा खणखणीत सवाल उपस्थित करत शिवसेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधुंमधील हा वाद आणखीनच शिगेला पोहचण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी निवडणुकांत काँग्रेस-राष्ट्रवादीचे भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी शिवसेना रान पेटवत असताना दुसरीकडे वडे आणि चिकन सूपवाले या वणव्यावर पाणी ओतून काँग्रेसवाल्यांना मदत करत असल्याची सणसणीत टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून राज यांच्यावर करण्यात आली आहे. यापूर्वी राज यांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आला होता. त्यावरून राज ठाकरेंचा पारा बराच चढला होता. ‘मातोश्री’वर बाळासाहेबांना तेलकट वडे दिले जात होते. ते पाहून मी त्यांना चिकन सूप पाठवण्यास सुरुवात केली आणि अखेरपर्यंत ते मी पाठवलेलं चिकन सूपच पीत होते, असा भावुक किस्सा सांगून त्यांनी उद्धव यांची जाहीर नाचक्की केली होती. त्यांच्या या जळजळीत टीकेचा अखेर ‘सामना’तून समाचार घेण्यात आला आहे.