देशात नक्की काय सुरू आहे आणि कोण काय करतोय तेच समजेनासे झाले आहे. देशातील सध्याची परिस्थिती ही  धुक्याच्या (फॉग) वातावरणाप्रमाणे धुसर आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विचार मांडले आहेत. यावेळी उद्धव यांनी काश्मीरमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेल्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या हिंदुत्त्ववादी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केंद्रात सत्ताबदल होऊनही हिंदू संकटातच आहे. ‘अब हिंदू मार नहीं खाएगा!’ ही गर्जना करणार्‍यांचे राज्य देशात व जम्मू-कश्मीरातही आहे. मात्र, काश्मीर खोर्‍यात अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ले झाले. जवान, पोलीस मारले गेले. सरकार बदलल्यावर हे चित्र बदलेल अशी अपेक्षा होती. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ खरं तर ती घोषणा शिवसेनाप्रमुखांनी लोकप्रिय केली, पण त्या घोषणेचे जनकत्व घेतलेले काही लोक आज आहेत. त्यांचे म्हणणे की, ही घोषणा त्यांनी लोकप्रिय केली. होय रे बाबांनो, पण आज हिंदू मार खातोय. कश्मीरमध्ये काय घडतंय बघा. त्याचे काय?, असा सवाल उद्धव यांनी या मुलाखतीदरम्यान उपस्थित केला.
यावेळी उद्धव यांना देशातील सद्य परिस्थितीविषयी विचारण्यात आले असता त्यांनी टेलिव्हिजनवरील एका जाहिरातीचा दाखला दिला. उद्धव यांनी म्हटले की, सध्या टी.व्ही.वरती एक जाहिरात चाललीय. त्या जाहिरातीमध्ये वेगवेगळी लोकेशन्स दाखवली जातात. त्यात आपल्या सीमेवरचंसुद्धा एक लोकेशन दाखवलंय. एक हिंदुस्थानी आणि पाकिस्तानी सैनिक दिसतो. तसंच इतर ठिकाणचं पण दाखवलंय. पाकिस्तानी सैनिक हिंदुस्थानी सैनिकाला विचारतो, ‘क्या चल रहा है?’ आणि ते सांगतात की ‘फॉग’ चल रहा है. आता फॉग म्हणजे तुम्हाला माहीत आहे. आपण धुकं म्हणतो. सध्या देशामध्ये तसंच वातावरण आहे. नक्की काय चाललंय तेच कळत नाही. नक्की कोण काय करतंय तेच कळत नाही आणि कारभार कोण करतंय तेही कळत नाही, असा टोला उद्धव यांनी केंद्र सरकारला लगावला. आज खंबीर नेतृत्व देशाला लाभलं आहे असं म्हणतात. मग त्या खंबीर नेतृत्वाची काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल विचारत उद्धव यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला सहभागी करून घेण्यात आले नव्हते. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील तणाव वाढला होता. राज्यातही या तणावाचे पडसाद उमटण्याची शक्यता होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या कलाने घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली होती. काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव यांची भेटदेखील घेतली होती.