मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात सोमवारी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारवर कडाडून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहिरातींच्या माध्यमातून स्त्री विकासाबद्दल चुकीचे चित्र उभे केले जात असल्याचे उदधव ठाकरेंनी सांगितले. तसेच निवडणुकांच्या काळात काँग्रेसकडून महिलांना पोलिस दलात २५टक्के आरक्षण देण्याचे वचन दिले जात आहे. परंतु, आझाद मैदानातील दंगलीच्यावेळी महिला पोलिस कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यात सरकारला अपयश आले त्याचे काय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेसला मत देणे म्हणजे काळोखात उडी मारण्यासारखे असल्याचे उद्धव यांनी सांगितले. तसेच दिल्लीश्वरांनी आजपर्यंत महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली. मुंबई आणि महाराष्ट्राकडे दिल्लीश्वरांनी कायमच सोन्याची कोंबडी म्हणून पाहिले. त्यामुळे दिल्लीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर नरेंद्र मोदींनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य द्यावे आणि महाराष्ट्राला न्याय द्यावा अशी मागणी उद्धव यांनी आपल्या भाषणातून केली.