शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या जागी स्मारक उभारणे आणि शिवाजी पार्कचे शिवतीर्थ असे नामांतर करण्याच्या मुद्दय़ावरून सध्या शिवसेना चांगलीच अडचणीत सापडली आहे. एक दिवसासाठी जागा दिली असताना पाऊण महिन्यानंतरही ती रिकामी न केल्यामुळे पालिकेने बजावलेल्या नोटीशीच्या पाश्र्वभूमीवर, येत्या शुक्रवारी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे आजपर्यंतचे मौन सोडून सेनेची भूमिका स्पष्ट करतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
शिवाजी पार्कवर स्मारकासाठी जागा मिळावी आणि शिवतीर्थ नामकरण करण्याबाबत शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते सुभाष देसाई, महापौर सुनील प्रभू, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे आणि उद्ध़व यांचे स्वीय सचिव मििलद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. मात्र, सर्वप्रथम शिवाजी पार्कवरील अंत्यसंस्काराची जागा पालिकेच्या ताब्यात द्या, त्यानंतरच अन्य मागण्यांवर चर्चा होऊ शकेल असे त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या भेटीची माहिती सुभाष देसाई, महापौर व स्थायी समिती अध्यक्षांनी बुधवारी मातोश्रीवर उद्ध़व ठाकरे यांना दिली. यापूर्वी स्मारकप्रकरणी शिवसैनिक व बाळासाहेबांच्या मध्ये मी येणार नाही, अशी भूमिका उद्धव यांनी घेतली होती. मात्र मनोहर जोशी व संजय राऊत यांच्या व्यतिरिक्त सेनेतील एकही नेता याबाबत तोंड उघडण्यास तयार नाही. महापौर सुनील प्रभू हे एकाकी पालिकेत किल्ला लढवत असून त्यांनीही स्मारकाबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील असे सांगितले.  
स्मारक प्रकरण चिघळत राहिल्यास ते शिवसेनेच्या हिताचे नसून भविष्यात न्यायालयातही अडचणीचे ठरू शकते हे लक्षात घेऊन सेनेला ठोस भूमिका घेणे भाग आहे. त्यामुळे याबाबत शुक्रवारी आपली भूमिका जाहीर करण्याचे उद्धव ठाकरे यांनी निश्चित केल्याचे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.  राज्य शासनाच्या विरोधात अविश्वास ठराव आणून जे हसे झाले तसेच नामकरणाच्या प्रस्तावाबाबत होऊ शकते, हेही आता स्पष्ट झाले आहे. स्थायी समिती अध्यक्ष राहूल शेवाळे यांनी घाईघाईने शिवतीर्थ नामकरणाची सूचना मांडली असली तरी शिवाजी महाराजांच्या नावे असलेल्या मैदानाचे नाव बदलण्यासाठी पालिकेतील सेनेकडे पुरेस संख्याबळ नाही तसेच लोकांचा तीव्र विरोध होऊ शकतो हे लक्षात घेऊन याही प्रश्नावर कशी माघार घेता येईल, याचा विचार सेनेचे नेते सध्या करत आहेत.     

पर्याय..?
अंत्यसंस्काराच्या जागेऐवजी त्याच्या लगत छोटे उद्यान तयार करणे, महापौर बंगल्यामध्ये अथवा शिवाजी पार्क तरणतलावालगत स्मारक करणे आदी पर्यायांवर विचार सुरु असून अंत्यसंस्काराची जागा मोकळी करून देईपर्यंत सरकारकडून कोणतेही सहकार्य मिळणार नाही, हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे स्पष्ट झाले आहे.