शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षाचे प्रमुख म्हणून निवड करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगच्या निकषांनुसार ही निवड करण्यात येणार असून त्याची माहिती आयोगाला कळविण्यात येणार असल्याचे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. ‘शिवसेनाप्रमुख’ केवळ बाळासाहेबच राहातील, आपण हे पद घेणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे कार्यकारी प्रमुख हे पदच कायम ठेवून प्रमुखपदाची जबाबदारी ते पार पडतील असे सूत्रांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर थोडय़ाच दिवसांत मातोश्रीवर झालेल्या शिवसेना नेत्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांना पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले. या निर्णयावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी अधिकृतपणे शिक्कामोर्तब  करून तो निर्णय निवडणूक आयोगाला कळविण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेना भवनात सेनेचे ज्येष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सेनेचे नेतृत्व उद्धव यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे काही उपनेत्यांना यावेळी नेतेपदी बढती देण्यात येणार असून काही जणांची उपनेतेपदी नव्याने निवड केली जाणार आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रचा दौर करण्याचा निर्णय घेतला असून येत्या ३ फेब्रुवारी रोजी ते जालना येथून दौऱ्याला सुरुवात करतील. त्यानंतर कोकण, विदर्भ व मराठवाडय़ात त्यांचे दौरे होणार असून या दौऱ्यांच्या आखणीचे काम सध्या सुरू आहे.
जालना येथून उद्धव ठाकरे यांचा ३ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र दौरा
आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रचा दौर करण्याचा निर्णय घेतला असून येत्या ३ फेब्रुवारी रोजी ते जालना येथून दौऱ्याला सुरुवात करतील. त्यानंतर कोकण, विदर्भ व मराठवाडय़ात त्यांचे दौरे होणार असून दौऱ्यांच्या आखणीचे काम सध्या सुरू आहे.