महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज होत असून शनिवारी शाखाप्रमुखांची बैठक घेतल्यानंतर सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. युतीचे काय होणार, त्याचा विचार करू नका, या वेळी विधानसभेसारखे होणार नाही, असे सांगत ठाकरे यांनी युतीचे संकेत दिले आहेत.

नगर परिषदांच्या निवडणुकीत यश मिळवल्याने आत्मविश्वास वाढलेला भाजप पालिका निवडणुकांसाठी जोरदार तयारी करीत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी १० डिसेंबर रोजी शहरात येत आहेत. त्याच वेळी शिवसेनेनेही बाह्य़ा सरसावल्या असून सेनेची ताकद असलेल्या शाखाप्रमुख व नगरसेवकांची बैठक घेऊन उद्धव ठाकरे यांनी निवडणुकांसाठी सज्ज राहण्यास सांगितले. युतीचे काय होईल ते आम्ही पाहू, तुम्ही त्याचा विचार करू नका. जिथे प्रभाग तुटले असतील तेथे शाखाप्रमुखांनी काम करावे. नगरसेवकांनीही आतापर्यंत केले त्याच पद्धतीने काम पाहावे. प्रभागाचा भाग दुसरीकडे गेला असेल तरीही तो तुमचाच असल्याचे समजून काम करा, असे सांगतानाच वशिलेबाजी चालणार नाही, असे सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत.