मलनिस्सारण वाहिनीतील सांडपाणी थेट तलावात; पालिकेच्या दिरंगाईमुळे जैवविविधता धोक्यात

केवळ कंत्राटदार नाही म्हणून तब्बल चार महिने फुटलेली मलनिस्सारण वाहिनी दुरुस्तीशिवाय पडून आहे. परिणामी पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या पवई तलावाला जोडलेल्या वाहिनीतून सांडपाणी तलावात जात आहे. यामुळे तलावातील जैवविविधता धोक्यात आली आहे. या प्रकरणाचे कोणतेही गांभीर्य पालिका अधिकाऱ्यांना नसल्यानेच हा प्रकार घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

पवई तलाव हा मुंबईतील एकमेव मोठा तलाव असून अनेक मुंबईकर व पर्यटकही येथे पर्यटनासाठी हमखास भेट देत असतात. सकाळच्या वेळी या दूरवपर्यंत पसरलेल्या या तलावाचे दृश्य विहंगम दिसायचे. पालिकेने पवई तलावासारख्या मोठय़ा तलावाच्या सुशोभीकरणासाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. मात्र, पालिकेचा हा खर्च म्हणजेच नुसत्याच बाता सिद्ध होत असून प्रत्यक्षात तलावांचे वास्तव गंभीर झाले असून या सांडपाण्यामुळे तलावाचे पाणी हिरवे-काळे झाले आहे. या तलावातून दरुगधी येत असून हा तलाव आहे की नाला हे देखील ओळखता येत नसून या सांडपाण्यामुळे येथील जैववैविध्य धोक्यात आले आहे. तलाव परिसरात दरुगधी व सांडपाण्यासोबत आलेला कचरा यामुळे हा तलाव हळूहळू विद्रूप होत चालला आहे. कारण, नजीकच्या परिसरातील हिरानंदानी, जेव्हीएलआर रस्ता, पवई व शेजारील काही इमारतींचे सांडपाणी या तलावात सोडण्यात येत असल्याचे काही पर्यावरणतज्ज्ञांनी सांगितले. याकडे मुंबई महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून सुशोभीकरणाच्या नावाखाली पालिकेने येथे खर्च केलेले कोटय़वधी रुपये नेमके खर्च झाले कुठे, असा सवाल पर्यावरण रक्षणकर्त्यां संस्थांनी उपस्थित केला. या प्रकरणी बोलताना ‘प्लॅण्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल्स वेल्फेअर सोसायटी’ (पॉझ) या संस्थेचे सुनीश कुंजू यांनी सांगितले की, या तलावात रीतसर सांडपाण्याचे पाणी सोडण्यात येत आहे.

याप्रकरणी आम्हाला काही दक्ष नागरिकांकडून गेल्या एक महिन्यांहून अधिक तक्रारी येत होत्या. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असून अखेर आम्ही मुख्यमंत्र्यांना या तलावाच्या दुर्दशेबाबत पत्र पाठवले आहे.

जैववैविध्य नष्ट होणार?

पवई तलाव अत्यंत मोठा असून येथे मगरींचे वास्तव्य आहे. तसेच, येथे हिवाळ्यात परदेशी पाहुणे येत असून येथील पक्षी संपदाही विपुल आहे. मात्र, यंदा परदेशी पाहुणे सोडाच तर स्थानिक पक्ष्यांनीदेखील फिरकणे बंद केले आहे. कारण, या तलावातील त्यांचे नैसर्गिक अन्न नष्ट होत असून त्याचा परिणाम त्यांच्या अधिवासावर झाला आहे. मगरींचीदेखील हीच परिस्थिती असून येथे बांधण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅकच्या जागेवर पूर्वी चिखलाचा भाग होता. मात्र हा जॉगिंग ट्रॅकमुळे त्यांचा अधिवास नष्ट झाल्याने त्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. असे ‘पॉझ’चे सुनीश कुंजू यांनी सांगितले.

याबाबत पालिकेच्या अभियंत्यांना विचारले असता एक धक्कादायक बाब समोर आली असून गेल्या चार महिन्यांपासून तलाव परिसरातील आदी शंकाराचार्य रस्त्यावरील एक मॅनहोल तुटले असून त्यातील पाणी या तलावात जात असल्याचे मलनिस्सारण अधिकाऱ्यांनी सांगितले.

मात्र, प्रथम हे काम करण्यासाठी ठेकेदार उपलब्ध नसल्याने आणि या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक असल्याने वाहतूक पोलिसांची परवानगी मिळत नव्हती म्हणून हे काम थांबले होते, असे चौकर यांनी पुढे सांगितले.

मात्र बुधवारी रात्री आम्ही या कामाला कोणत्याही परिस्थितीत सुरुवात करणार असल्याचे या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर स्पष्ट केले.