पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेल्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा झालेली मुंबई-अहमदाबाद ही बुलेट ट्रेन प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्रीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या बुलेट ट्रेनच्या कामात आर्थिक सहाय्य करण्यास इच्छुक असलेल्या चीनचे शिष्टमंडळ सोमवारी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला भेट देण्यासाठी आले. त्या वेळी या बुलेट मार्गातील मुंबई शहर व अहमदाबाद शहर हे टप्पे स्थानकांसह भुयारी असू शकतील का, याबाबत चर्चा झाली. चीनकडे सध्या तसे तंत्रज्ञान असून अशा प्रकारच्या भुयारी बुलेट ट्रेनची उभारणी शक्य असल्याचे या शिष्टमंडळाने सांगितले.
मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनसाठी चीन आणि जपान या दोन्ही देशांनी अर्थसहाय्य आणि तंत्रसहाय्य करण्याची तयारी दाखवली आहे. तसेच बुलेट ट्रेनसाठी आवश्यक तंत्रसहाय्य पुरवण्यासही हे देश तयार आहेत. या पाश्र्वभूमीवर चीनच्या परिवहन मंत्रालयाचे उपमंत्री आणि नॅशनल रेल्वे अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे मुख्य अधिकारी लू डाँग फू यांच्या नेतृत्त्वाखाली आलेल्या शिष्टमंडळाने सोमवारी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला भेट दिली.
या भेटीदरम्यान बुलेट ट्रेनचा विषय निघाला असता, मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणारी ही बुलेट ट्रेन उन्नत मार्गाने चालवण्याऐवजी मुंबई व अहमदाबाद या शहरी भागांत भुयारी मार्गाने चालवणे शक्य आहे का, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी विचारले. या गाडीचे सुरुवातीचे व शेवटचे स्थानक भुयारी ठेवून शहरी परिसरातील २०-२५ किमीच्या टप्प्यात ही गाडी भुयारी चालवणे सोयीचे ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यावर लू डाँग फू यांनी अशा प्रकारची भुयारी बुलेट ट्रेन चीनमध्ये चालवत असल्याचे सांगितले.
बुलेट ट्रेन भुयारातून वर येण्यासाठी २०० मीटर लांबीमागे एक मीटरने उंची वाढू शकते. म्हणजेच ही गाडी १० मीटर उंचीवर जाण्यासाठी दोन किलोमीटर लांब धावावी लागेल. मुंबईत उन्नत मार्ग उभारणे जिकीरीचे असल्याने अशा प्रकारे भुयारी ट्रेन असल्यास ते जास्त सोयीचे ठरेल. तसेच ही गाडी थेट चर्चगेट किंवा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत येऊ शकेल, असे सूद यांनी सांगितले. वांद्रे-कुर्ला संकुलातून ही गाडी सुरू केल्यास प्रवाशांना आपापल्या घरून तेथे पोहोचायलाच दोन ते अडीच तास लागतील. त्यापेक्षा सीएसटी किंवा चर्चगेट येथूनच ही गाडी सुटणे फायद्याचे असेल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. मात्र या प्रकरणी अंतिम निर्णय केंद्राचा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

गाडी सीएसटीतून सुटणे फायद्याचे
वांद्रे-कुर्ला संकुलातून ही गाडी सुरू केल्यास प्रवाशांना आपापल्या घरून तेथे पोहोचायलाच दोन ते अडीच तास लागतील. त्यापेक्षा सीएसटी किंवा चर्चगेट येथूनच ही गाडी सुटणे फायद्याचे असेल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. मात्र या प्रकरणी अंतिम निर्णय केंद्राचा असेल, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले.