सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार युनिनॉर मोबाइल कंपनीचा परवाना रद्द झाल्याने कंपनीची सेवा शनिवार रात्री पासून बंद झाली आहे. यामुळे मुंबईतल्या सुमारे १८ लाख युनिनॉर ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे.
गेल्या वर्षी टूजी स्पेक्ट्रम प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने १२२ कंपन्याचे परवाने रद्द केले होते. नवीन स्पेक्ट्रमसाठी नवीन लिलावात भाग घेण्यासाठी कंपन्यांना सांगण्यात आले होते. पंरतु युनिनॉरने नवीन स्पेक्ट्रम घेतले नव्हते. त्यामुळे युनिनॉरची सेवा तात्काळ प्रभावाने खंडीत करण्यात आली. ग्राहकांना शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास मेसेजेस आले आणि त्याच्या अवघ्या पंधरा मिनिटांनंतर सेवा खंडीत झाली. मुंबईत युनिनॉरचे १८ लाख ४० हजार ग्राहक असून त्यांची सेवा बंद झाली आहे. किरकोळ मोबाईल विक्रेत्यांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. अनेकांनी हजारो रिचार्ज कुपन विकत घेतले असून त्याचा आर्थिक फटका बसणार आहे.