जागावाटपाच्या मुद्दय़ावरुन आक्रमक भाजपला सडेतोड प्रत्युत्तर देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले असताना केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचे आदेश देत ‘स्वाभिमान’ जपण्याचा विचार शिवसेनेत सुरू झाला आहे. भाजपला केंद्रात बहुमत असले आणि शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज नसली तरी शिवसेनेला गृहीत धरू नये आणि सत्तेपेक्षा शिवसेना आत्मसन्मानाला अधिक महत्व देते, हे दाखवून देण्यासाठी गीते यांना लवकरच राजीनाम्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.
जागावाटपाच्या मुद्दय़ावरुन शिवसेना-भाजप मधील वाद विकोपाला गेले असून ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत भाजपच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे. ‘शिवसेना कधीही झुकणार नाही,’ आणि आमचा पाठीचा कणा ताठ आहे, हे दाखविणारा निर्णय ठाकरे यांनी घ्यावा, अशी एकमुखी मागणी शिवसेना नेत्यांनी केली आहे. त्यामुळेच भाजपला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत  एकही जागा वाढवून न देण्याची आणि निम्म्या जागांची मागणी धुडकावण्याची भूमिका ठाकरे यांनी जाहीर केली. भाजपवर दबाव वाढावा आणि शिवसेना सत्तेसाठी कोणतीही तडजोड करीत नाही, हे कृतीतून दाखविण्यासाठी गीते यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगण्याची खेळी शिवसेनेकडून खेळली जाण्याची शक्यता आहे.