माटुंग्याचे रूईया आणि मालाडचे नगिनदास खांडवाला या दोन महाविद्यालयांसह मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाला स्वायत्तता देण्याच्या निर्णयाला विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने मंगळवारी हिरवा कंदिल दाखविला.
विद्वत परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तब्बल ६५० महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत. यापैकी दर्जेदार व सक्षम महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याचे विद्यापीठाचे धोरण आहे. या धोरणाचा भाग म्हणून विद्यापीठाने सात महाविद्यालयांना स्वायत्ततेचा दर्जा बहाल केला आहे. त्यात या दोन महाविद्यालयांची भर पडली आहे. त्याचबरोबर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र या विभागांबरोबरच विद्यापीठाने समाजशास्त्र विभागालाही स्वायत्ततेचा दर्जा बहाल केला आहे.
विविध स्तरांवर स्वातंत्र्य
स्वायत्त संस्थांना व महाविद्यालयांना अभ्यासक्रम व शिक्षणक्रम ठरविण्याचे स्वातंत्र्य मिळते. या शिवाय परीक्षांबाबतही स्वातंत्र्य मिळते. नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतही स्वायत्तता मिळते.
यावर्षीच्या शैक्षणिक सत्राच्या कालावधीत बदल करण्याचाही निर्णय परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पहिले सत्र ७ जून ते १७ ऑक्टोबर २०१४, तर दुसरे सत्र ३ नोव्हेंबर २०१४ ते ३० एप्रिल २०१५ असे असेल. त्याचबरोबर नाताळची सुट्टी २४ डिसेंबर ते ७ डिसेंबर अशी असेल.