उलट दरवर्षी परीक्षा विभागाकरिता अर्थसंकल्पात बाजूला काढलेला सर्वच्या सर्व पैसाही खर्च होत नसल्याची माहिती समोर आली आहे.
परीक्षा विभागाकडे पुरेसे कर्मचारी नाहीत म्हणून परीक्षा विभागाच्या कामात गोंधळ होतो, असे कारण नेहमी पुढे केले जाते. पण, परीक्षा विभागाकरिता विद्यापीठ दरवर्षी कोटय़वधीचा निधी मंजूर करते. यापैकी कितीतरी पैसा वापरलाच जात नाही. उदाहरणार्थ २०१२मध्ये वाणिज्य शाखेच्या परीक्षाविषयक कामाकरिता विद्यापीठाने १ कोटी २६ लाख रुपयांची तरतूद केली होती. ही रक्कम कुठल्याही शाखेपेक्षा जास्त आहे. पण, या पैकी केवळ ७३ लाख रुपयेच खर्च करण्यात आले होते.
विहार दुर्वे यांनी माहितीच्या अधिकाराखाली विद्यापीठाचा परीक्षा विभाग शाखानिहाय किती खर्च करतो याची माहिती मागविली होती. त्याला विद्यापीठाने दिलेल्या उत्तरात ही माहिती समोर आली आहे. गेल्या चार वर्षांत विद्यापीठाने प्रत्येक शाखेच्या परीक्षेच्या कामाकरिता किती पैशाची तरतूद केली होती आणि त्यापैकी किती खर्च केले याची माहिती दिली आहे. विद्यापीठ सर्वाधिक खर्च वाणिज्य शाखेवर करते. तर सर्वात कमी फाइन आर्टवर केला जातो.

निधीची तरतूद करण्याच्या पद्धतीत कोणतेही सूत्र नसल्याची टीका दुर्वे यांनी केली. उदाहरणार्थ २०१२मध्ये वाणिज्य शाखेने १ कोटी २६ लाखांपैकी केवळ ७३ लाख खर्च केलेले असतानाही त्यानंतरच्या वर्षांकरिता पुन्हा विद्यापीठाने १ कोटी ७८ लाख रुपये तरतूद केली आहे. विद्यापीठाचे यावर म्हणणे असे की, दरवर्षी अंदाजे निधीची तरतूद केली जाते. राखून ठेवलेले पैसे खर्च केलेच पाहिजेत, असे नाही. निधीची कमतरता भासू नये म्हणून संभाव्य खर्चापेक्षा थोडे अधिकचे पैसे राखून ठेवले जातात, असा खुलासा विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी केला.