शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाच्या नवी मुंबई येथील कार्यालयावर करण्यात आलेल्या दगडफेकीची जबाबदारी संभाजी ब्रिगेडकडून स्वीकारण्यात आली आहे. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत विकास पासलकर यांनी  ‘सामना’तील व्यंगचित्रामुळे मराठा समाज संतप्त झाल्यामुळे अशाप्रकारची प्रतिक्रिया व्यक्त होऊ शकते, असे म्हटले आहे. मात्र, मराठा युवकांनी संयमाने वागावे, असे आवाहनही संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आले आहे. मराठा समाजातील तरुणांनी संयम राखावा, मराठा मूक मोर्चा हा देशातच नव्हे तर जगात आदर्श ठरेल, असे नियोजन करावे, असे संभाजी ब्रिगेडचे नेते विकास पासलकर यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनीही शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. यानिमित्ताने मराठा समाजाच्या प्रश्नांवर सेनेची भूमिका कळली. मराठा मोर्चाबाबतचे ‘सामना’तील व्यंगचित्र संतापजनक आहे. या व्यंगचित्राप्रकरणी सरकारने ‘सामना’वर कारवाई करावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. तसेच मराठा आरक्षणावर सरकारने त्वरीत निर्णय घ्यावा. सरकारने येत्या दोन दिवसांत यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, असे मुंडे यांनी म्हटले.
‘सामना’च्या नवी मुंबई आणि ठाण्यातील कार्यालयांवर मंगळवारी काही अज्ञातांकडून हल्ला करण्यात आल्याच्या घटना घडली. सुरूवातीला ‘सामना’च्या वाशी येथील कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली. त्यानंतर काहीवेळातच सामनाच्या ठाण्यातील कार्यालयावर अज्ञातांकडून शाईफेक करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी ‘सामना’मध्ये मराठा मूक मोर्चाबाबत प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या व्यंगचित्रामुळे मराठा समाजाचा अपमान झाल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त झाली होती. राज्यात काही ठिकाणी ‘सामना’चे अंकही जाळण्यात आले होते. या व्यंगचित्रातून मराठा समाजाचा अपमान करण्यात आला आहे, असे सांगत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला होता. हे व्यंगचित्र मराठा क्रांती मोर्चात सहभागी झालेल्या मात-भगिनींचा अपमान असल्याचे सावंत यांनी म्हटले होते. मात्र, ‘सामना’ने हा आरोप फेटाळून लावला असून, मराठा समाजाच्या भावनांचा अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट केले होते.