गेल्या दोन बैठकांच्या वेळी पालिका सभागृहाबाहेर एक अज्ञात व्यक्ती टेहळणी करीत असल्याची बाब सोमवारी उघडकीस आली. सुरक्षारक्षकांनी हटकल्यानंतर आपण सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या जवळची व्यक्ती असल्याची बतावणी करीत या व्यक्तीने पळ काढला. मात्र या प्रकारामुळे सभागृहाच्या बैठकीच्या वेळी पालिका मुख्यालयात ठेवण्यात येणाऱ्या सुरक्षारक्षकांच्या कडेकोट बंदोबस्ताबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून देताच त्यांनी या व्यक्तीची विचारपूस करण्याची सूचना तेथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना केली. दरम्यान, सभागृहात सोमवारी काही प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार होती. त्यामध्ये अंधेरी येथील एका रस्त्याच्या कामाच्या प्रस्तावाचा समावेश होता. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळते का यासाठी ही व्यक्ती टेहळणी करीत असल्याचे उघडकीस आले आहे.