राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घोषित केलेले चार हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज देताना राज्य  सरकारची दमछाक होत आहे. त्यात पुन्हा अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने सरकारची झोप उडाली आहे. या पावसाने राज्याच्या अनेक भागात विविध पिकांचे नुकसान झाले असून, त्याचा त्वरित आढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांना दिले आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका आंबा आणि द्राक्षाच्या फळबागांना तसेच गहू, रब्बी ज्वारी आणि हरबरा पिकांना बसण्याची शक्यता आहे.
 गेल्या अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना घोषित केलेल्या मदतनिधीसाठी राज्याने केंद्राला साकडे घातले. मात्र केंद्राने अद्याप कोणतीही मदत न दिल्याने राज्य सरकार आपल्या तिजोरीतूनच मदत करीत आहे. ही मदत देताना सरकारची दमछाक होत आहे. त्यातच राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांबरोबरच शासनाचीही चिंता वाढली आहे. कृषी विभागाने नुकसानीचा आढावा घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असून, दोन दिवसांत नेमके किती नुकसान झाले आहे, याचा अंदाज येईल. मात्र या पावसाने शेतकऱ्यांची आणि शासनाचीही चिंता वाढविल्याची माहिती कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुधीर गोयल यांनी दिली. पावसाबाबत २४ तारखेलाच शेतकऱ्यांना कल्पना देण्यात आली होती. मात्र तयार झालेली पिके धोक्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सरकारला खरोखर शेतकऱ्यांची काळजी असेल, तर त्यांनी हवामानावर आधारित पीक विम्याची व्याप्ती वाढवून निकष बदलावेत आणि किमान दोन वष्रे हप्ते भरावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

एका संकटातून सावरण्याआधीच आता गहू, हरबरा, द्राक्षे, आंबे, काजू यासारख्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे. त्यामुळे सरकारने पीक विम्याची व्याप्ती वाढवावी, तसेच या विम्याची रक्कम जास्त असल्यामुळे कंगाल झालेला शेतकरी त्याचा भार उचलू शकत नाही. त्यामुळे सरकारने किमान दोन-तीन वष्रे हप्ते भरावेत.
– राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते

वादळी पावसाने झोडपले
पूर्व व पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्याला शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर वादळी पावसाने झोडपले आहे. त्यामुळे फळबागांबरोबरच रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात येत्याच दोन दिवसात वादळी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच, काही भागात गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. पुणे शहरात रविवारी सायंकाळपर्यंत तब्बल पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात शनिवारी दुपार पासून वादळी पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे कोकणात आंब्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रात द्राक्षांच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याबरोबरच उत्तर महाराष्ट्रात कांदा पिकाला पावसाचा मोठा फटका बसला आहे. राज्यात अनेक ठिकाणी गहू, हरभरा, ज्वारी पिकांची काढणी सुरू असून पावसाचा त्याला फटका बसला आहे.  पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. पावसामुळे राज्यातील कमाल तापमान दहा ते बारा अंशानी खाली आले आहे.
****
नाशिकमध्ये २ बळी
नाशिक जिल्हय़ात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीने दोघांचा बळी घेतला. देवळा तालुक्यातील महालपाटणे येथे कूपनलिकेची मोटर बंद करताना सुनील आहेर (वय २५) विजेचा धक्का लागून बेशुद्ध पडला. त्याला वाचवण्यासाठी वडील दामोदर केदार आहेर (५४) धावले आणि तेही धक्का लागून कोसळले. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

****
यवतमाळमध्ये एक ठार
यवतमाळ जिल्ह्य़ात शनिवारी झालेला वादळी पाऊस, गारपीट आणि विजेने एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहे. उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथील शेतकरी पांडुरंग चिकणे यांच्या अंगावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले. त्याची विशाल (१७) आणि मनोज (१९) ही मुले जखमी झाली.
****
कोकण, गोवा, मध्य-महाराष्ट्रात आणि विदर्भ आणि मराठवाडा येथे येते दोन दिवस तरी हा पाऊस सुरू राहील. गुजरातमध्ये कच्छ-सौराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही पाऊस पडत आहे.

****
मुंबई परिसरातही सरी
शनिवारपाठोपाठ रविवारीही मुंबई, ठाणे आिँण नवी मुंबई परिसराला अवकाळी पावसाने भिजवून टाकले. मुंबई-ठाण्यात रविवारी सकाळी ढगांची गर्दी झाली होती. दुपारी काही काळ उन्हाचे दर्शन झाले, मात्र top02संध्याकाळी काही भागांत पावसाच्या जोरदार तर काही भागांत तुरळक सरी कोसळल्या.
****
अजून दोन दिवस पाऊस?
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात ३८ अंशाकडे झुकलेला मुंबईतील पारा थेट २६ अंश सेल्सिअसवर स्थिरावला. कमाल तापमानात घट झाली असताना मुंबईचे किमान तापमानही सहा अंशांनी घसरून १८ अंश सेल्सिअसवर आले. वेधशाळेच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.