विद्यमान सरकार ज्यामुळे पंगू झाले तो धोरणलकवा दूर करणे, आर्थिक सुधारणा राबविण्यास प्राधान्य देणे यास माझे प्राधान्य असेल आणि आगामी सरकार अटलबिहारी वाजपेयी यांनी आखून दिलेल्या मार्गाने जाणारेच असेल, असे नि:संदिग्ध प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ‘लोकसत्ता’स दिलेल्या विशेष मुलाखतीत केले. काही विशिष्ट उद्योगपतींशी असलेल्या कथित संबंधांपासून हुकूमशाही वागणुकीपर्यंतच्या सर्व प्रश्नांना मोदी यांनी या मुलाखतीत सारख्याच मोकळेपणाने उत्तरे दिली.
उत्तर प्रदेशच्या खालोखाल लोकप्रतिनिधी संसदेवर पाठवणाऱ्या महाराष्ट्राकडे मोदी यांचे विशेष लक्ष आहे. या निवडणुकीत राज्याच्या वेगवेगळय़ा विभागांतील १५ प्रचंड सभांतून त्यांनी महाराष्ट्र शब्दश: पिंजून काढला. एखाद्या कंपनीच्या मुख्याधिकाऱ्याने बाजारपेठेचा अभ्यास करावा तद्वत मोदी यांच्याकडून आपल्या प्रचारसभांचा अभ्यास केला जातो. सभाक्षणापर्यंत अगदी बारीकसारीक तपशीलही आपल्यापर्यंत येईल, अशी व्यवस्था त्यांच्याकडून स्थापन करण्यात आली असून ती देशभर तितक्याच परिणामकारकतेने राबविली जात आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत वेळ काढत आणि साधत मोदी यांनी ‘लोकसत्ता’शी बातचीत केली. एका बाजूने हात हलवून जनतेच्या अभिवादनाचा स्वीकार, तर दुसरीकडे त्याचवेळी आपले परराष्ट्र धोरण कसे असेल त्यावर भाष्य, अशी ही मुलाखत. दोन वेगवेगळ्या टप्प्यांत झालेल्या मुलाखतीचा हा गोषवारा..
* प्रचार ऐन जोमात येत असतानाची मोदी यांची भाषणे राजकीय विरोधकांवर तोंडसुख घेणारी होती. त्या तुलनेत मुलाखती मात्र शांत आणि संयत होत्या. आपला विकासाभिमुख चेहेराच त्यातून समोर येईल याची काळजी
मोदी जाणीवपूर्वक घेताना आढळले. राजकारणापेक्षा पलीकडचे आणि महत्वाचे असलेले अर्थकारण, उद्योग धोरण, परराष्ट्र संबंध आदी विषयांवर धोरणात्मक मुद्दे मांडण्याकडे त्यांचा कल दिसत होता.
* या मुलाखतीत मोदी यांनी उद्योग आणि अर्थक्षेत्रात पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी आपल्याकडून तातडीने पावले उचलली जातील, असे आवर्जून नमूद केले. त्यांच्या मते सरकारच्या विविध समित्यांनी, काय चुकत आहे आणि घोडे कोठे पेंड खात आहे याच्या अनेक पाहण्या करून सविस्तर शिफारशी सादर केल्या आहेत. त्यामुळे जे काही झाले त्याची कारणे शोधण्यात पुन्हा वेळ घालवण्याऐवजी आहेत त्या समित्यांच्या शिफारशी प्रत्यक्ष अंमलात आणणे अधिक गरजेचे आहे.
* स्थानिक पातळीवर फक्त ते एक दोघांचीच मदत घेतात. महाराष्ट्रापुरते त्यांचे मदतनीस दोन. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे. महाराष्ट्रात कुठे कुठे जाणार या प्रश्नाला, ये दो जहाँ ले जाएंगे वहाँ..हे त्यांचे उत्तर.