राज्यातील भारतीय जनता पार्टी-शिवसेना शासनाने उपनगरांतील चटईक्षेत्रफळ दुप्पट करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या असून तसा प्रस्ताव नगरविकास खात्याने मुख्यमंत्र्यांकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्यास उपनगराला आता मिळत असलेल्या १.३३ ऐवजी १.६६ इतके चटईक्षेत्रफळ उपलब्ध होईल. उपनगरांत दोन चटईक्षेत्रफळ वापरण्याची मुभा असल्यामुळे विकासकांना पॉइंट ३४ इतक्या टीडीआरवर अवलंबून राहावे लागेल. वाढीव चटईक्षेत्रफळाचा दर सध्याच्या शीघ्रगणकानुसार लागू करण्यात येणार असल्यामुळे टीडीआरच्या दरातही वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उपनगरांतील चटईक्षेत्रफळ दुप्पट झाल्याचा फायदा सीआरझेड परिसरातील बांधकामांना होणार का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. सीआरझेड परिसरातील बांधकामांना १.३३ इतकेच चटईक्षेत्रफळ मिळत होते. त्यांना पॉइंट ६७ टीडीआरचा लाभ मिळत नव्हता. पॉइंट ६६ चटईक्षेत्रफळ उपलब्ध केल्यास सीआरझेड क्षेत्रातील काही बांधकामांना फायदा होण्याची शक्यता आहे.
शहरात १.३३ चटईक्षेत्रफळ लागू होते, तर उपनगरांत एक चटईक्षेत्रफळ आणि एक टीडीआर लागू होता. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना उपनगरांसाठी पॉइंट ३३ चटईक्षेत्रफळ वाढवून देण्यात आले होते. त्यामुळे १.३३ चटईक्षेत्रफळ आणि पॉइंट ६७ टीडीआर विकासकांना घेता येतो. नव्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास विकासकांना फक्त पॉइंट ३४ टीडीआर घ्यावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले.