रोकडरहित व्यवहारांसाठी मध्य रेल्वेचा पुढाकार

निश्चलनीकरणानंतर उडालेल्या गोंधळावर ‘कॅशलेस’चा तोडगा काढण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यावर रेल्वेनेदेखील ‘कॅशलेस’ व्यवहार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

यासाठी रेल्वे मंत्रालयाने प्रत्येक तिकीट खिडकीवर प्रवाशांकडून डेबिट कार्डद्वारे पसे घेऊन पास उपलब्ध करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी मध्य रेल्वेकडून सर्व माहिती मागविण्यात आल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

[jwplayer PgJegmaO]

रेल्वे स्थानकांतील एटीव्हीएम (ऑटोमॅटिक तिकीट वेंिडग मशीन) यंत्राद्वारे स्मार्ट कार्डचा वापर करतानाच डेबिट, क्रेडिट कार्डचाही वापर करून तिकीट उपलब्ध केले जाऊ शकते का, याची चाचपणी सध्या रेल्वेच्या क्रिसकडून (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉम्रेशन सिस्टीम) केली जात आहे. अशा प्रकारची सेवा उपलब्ध करण्याचा विचार असतानाच रेल्वे मंत्रालयाने सर्व तिकीट खिडक्यांवर तिकीट, पास काढतानाच कॅशलेस सुविधेला प्राधान्य दिले आहे. दिवसभरात प्रवाशांकडून तिकीट, पास काढले जात असल्याने मोठय़ा प्रमाणात रकमेची उलाढाल होत असते. त्यामुळे रोखीची उलाढाल करण्याऐवजी तिकीट खिडक्यांवर डेबिट कार्डद्वारे शुल्क भरून तिकीट, पास उपलब्ध करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रवासी संख्या असलेल्या मुंबई लोकल मार्गावर प्रथम ही योजना आणण्याचा प्रयत्न आहे.

त्यासाठी रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेकडे तिकीट खिडक्यांची माहिती, प्रवाशांची माहिती तसेच पास, तिकीट आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मागितली आहे. ही माहिती गुरुवारीच रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर पीओएस (पॉईंटर ऑन सेल) मशीन उपलब्ध केले जाईल. मशीनमध्ये कार्ड स्वाइप केल्यानंतर पास किंवा लांब पल्ल्याचे तिकीट उपलब्ध होईल. कार्डद्वारे पसे अदा करायचे

असल्यास मोठी रक्कम असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रथम लोकल पास आणि लांब पल्ल्याच्या तिकिटांसाठी ही योजना आणण्याचा रेल्वेचा विचार आहे. त्यानंतर लोकल तिकिटाचा विचार केला जाईल, असे सांगण्यात आले.

‘क्रेडिट कार्ड’ही वापरता येणार

डेबिट कार्डबरोबरच क्रेडिट कार्डचाही वापर करता येणार आहे. मध्य रेल्वेवरील उपनगरीय स्थानकांवर ४३० तिकीट खिडक्या आहेत. प्रत्येक तिकीट खिडकीवर पीओएस मशीन मिळावे यासाठी मध्य रेल्वेचे प्रयत्न आहेत. मात्र तो निर्णय रेल्वे बोर्डाकडून घेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत संपल्यानंतर कोणताही गोंधळ उडू नये यासाठी १ जानेवारी २०१७ पासून त्याची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे.

[jwplayer PrZg1AfZ]