विद्यार्थ्यांमधील वाचनाची गोडी वाढावी, तसेच कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर वाचनाशिवाय पर्याय असूच शकत नाही, हे विद्यार्थ्यांवर बिंबविण्यासाठी मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर येथील तब्बल १५ हजारांहून अधिक शाळांमध्ये येत्या गुरुवारी म्हणजे १५ ऑक्टोबर या माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी ‘वाचू आनंदे’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
कलाम यांचे लेखन विद्यार्थ्यांना व युवकांना प्रेरणा देणारे आहे. म्हणून त्यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला होता.  १५,५३२ शाळांमधील ४८,८२,६७० विद्यार्थी या उपक्रमाअंतर्गत सहभागी होतील. शाळा भरल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना आधी या उपक्रमाचे महत्त्व समजावून सांगणे,  लेखक, कवी, कला, नाटय़, सिनेमा, निवेदन, साहित्य, विज्ञान तसेच क्रीडा या क्षेत्रांतील मान्यवर आणि विद्यार्थ्यांचा संवाद घडवून देणे,  प्रकट वाचन कसे करावे याचे शिक्षकांकडून सादरीकरण करणे,   किंवा निवेदन, सिनेमा, नाटय़ क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रकट वाचनाची अनुभूती विद्यार्थ्यांना करून देणे, विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तके न आणता त्यांच्या आवडीचे पुस्तक सोबत नेणे, पुस्तके उपलब्ध होऊ शकली नाहीत तर शाळांच्या ग्रंथालयातून ती उपलब्ध करुन देणे,   विद्यार्थ्यांनी वर्गातील विद्यार्थ्यांसमोर प्रकट वाचन करणे,  विद्यार्थ्यांना वाचनात येणाऱ्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करणे, आदी उपक्रमाचे विविध पैलू आहेत. यासाठी शिक्षकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई विभागाचे उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी केले आहे.