काँग्रेस आघाडी सरकारमध्ये दहा वर्षांपासून भागीदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेसच्या कारभारावर समाधानी नाहीत, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवरील पवार यांची नाराजीही निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा उफाळून आली आहे. आघाडीचा धर्म काँग्रेसकडून पाळला जात नसल्याची सूचक खंतही पवार यांच्या वक्तव्यातून व्यक्त झाल्याने, भविष्यातील त्यांच्या राजनीतीबद्दल राजकीय क्षेत्रात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारमध्येही अन्य पक्ष भाजपसोबत होते, पण त्यांच्यात फारसे मतभेद नव्हते. वाजपेयी यांनी रालोआ सरकार अधिक चांगल्या रीतीने चालविले, याउलट काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यात तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि अन्य लहानमोठे पक्ष आघाडीपासून दुरावले अशी खंत व्यक्त करीत पवार यांनी आघाडी सरकार चालविण्यातील काँग्रेसच्या अपयशावरच अप्रत्यक्षपणे बोट ठेवले. निवडणुकांचा माहोल सुरू असतानाच एका दूरचित्रवाहिनीवरील मुलाखतीत पवार यांनी आपल्या या भावनांना वाट करून दिल्याने काँग्रेसप्रणीत आघाडीला हादरा बसला आहे.
काँग्रेसच्या संघटनात्मक नीतीवर टीका करताना पवार यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांची मात्र स्तुती केली. अर्थात केंद्रीय मंत्रिमंडळाने एखादा सामूहिक व धाडसी निर्णय घेतला की त्याच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असते, पण तसे घडले नाही, असे नमूद करीत पवार यांनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांच्या हस्तक्षेपाबद्दलच नाराजी व्यक्त केली. आदर्श प्रकरणात काँग्रेसने मारलेल्या कोलांटउडय़ांवरही पवार यांनी थेट ताशेरे ओढले. आदर्श अहवाल फेटाळण्याचा सरकारचा निर्णय डावलून काँग्रेसने अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविले, आणि खूप धाडसी निर्णय घेत असल्याचा आभास निर्माण केला. राहुल यांनीच तेव्हा आदर्श अहवाल नाकारण्याच्या निर्णयावर टीका केली होती, पण आता घूमजाव करून चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारीही दिली, असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाने जारी केलेला अध्यादेशही राहुल गांधी यांच्यामुळेच मागे घ्यावा लागला, अशा शब्दांत पवार यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह उमटविले. यामुळेच समाजात चुकीचा संदेश गेला व सरकारच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम झाला, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
राहुल यूपीएचे नेते नव्हेत!
राहुल गांधी आणि आपणामध्ये पिढीचे अंतर आहे, अशी कबुली यावेळी पवार यांनी दिली. मात्र राहुल गांधी हे संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेते नाहीत. भविष्यातही आपला पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडीसोबतच राहील पण सत्ता आली तरी सरकारमध्ये स्वत: सहभागी न होता पक्षातील तरुणांना त्यामध्ये संधी मिळावी यासाठी पुढाकार घेऊ, असे पवार म्हणाले.