वाकोला पोलीस ठाण्यात शिस्त आणण्याचा प्रयत्न करणारे कर्तव्यदक्ष व उच्चविद्याविभूषित वरिष्ठ निरीक्षक विलास जोशी यांची एका सहायक उपनिरीक्षकाने गोळ्या झाडून केलेल्या हत्येमुळे पोलीस दलात कमालीची हळहळ व्यक्त होत आहे. अतिताणातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी संबंधित सहायक उपनिरीक्षकाला वेळोवेळी आवश्यक असलेल्या सुटय़ा देण्यात आल्यामुळे निव्वळ ताणातून नव्हे तर अन्य कारणांमुळे हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे.
वाकोला पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळणारे जोशी हे चांगले अधिकारी होते. कनिष्ठ कर्मचाऱ्यांशीही ते सौजन्याने वागत असत, मात्र चुका करणाऱ्या कर्मचाऱ्याची ते अजिबात गय करीत नसत. त्यांच्यावर गोळी झाडणाऱ्या दिलीप शिर्के या सहायक उपनिरीक्षकाला वेळोवेळी सुटय़ाही मंजूर करण्यात आल्या होत्या. आजारपणाची ३८ दिवसांची रजाही त्याला मंजूर करण्यात आली होती. त्यानंतरही तो सात-आठ दिवस न सांगता गैरहजर होता. तरीही या कालावधीतील रजा त्याला मंजूर करण्यात आली होती. त्यामुळे ताण असह्य़  होऊन त्याने गोळ्या झाडल्याची शक्यता नाही. त्यामागे आणखी काही कारण असावे, असे मत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले. याचा अर्थ प्रत्येक पोलीस ठाण्यात सतत पोलिसांचा मानसिक छळ केला जातो, असा होत नाही. मात्र काहीतरी कुठेतरी चुकत आहे, हे निश्चित. या सर्व बाबींचा आढावा घेतला जाणार असून त्यानुसार आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

नेमके कारण काय घडले असावे, याचा आम्ही आढावा घेत आहोत. पोलिसांवरील ताण कमी व्हावा यासाठी योगवर्ग तसेच व्यायामाची व्यवस्था करून देण्यात आली आहे. आणखी काय करता येईल, याची चाचपणी केली जाईल.
 – देवेन भारती, सहआयुक्त, कायदा व सुव्यवस्था