अविनाश-ऐश्वर्या नारकर यांच्यासह एक संस्मरणीय संध्याकाळ;  अशोक मुळ्ये यांची संकल्पना

व्हॅलेण्टाइन्स डे म्हटल्यावर साधारणपणे मुंबईतील शिल्लक असलेल्या बागांमधील आडोशाच्या जागा, तेथे घुटमळणारी आणि प्रेमाचे हितगुज करणारी जोडपी, लाल रंगाची सॉफ्ट टॉइज, मावळत्या सूर्याला साक्षीला ठेवून वरळी किंवा मरिन ड्राइव्हच्या किनाऱ्यावर एकमेकांसह घेतलेल्या प्रेमाच्या आणाभाका, असे दृश्य डोळ्यासमोर येते. पण मराठी चित्रपटसृष्टीतील एका सदाबहार जोडीने अनोख्या पद्धतीने व्हॅलेण्टाइन्स डे साजरा केला. ही जोडी म्हणजे अविनाश आणि ऐश्वर्या नारकर आणि त्यांच्यासह व्हॅलेण्टाइन्स डे साजरा करण्यासाठी होत्या तब्बल १०७ पावसाळे पाहिलेल्या कमलाबाई मुंढले नावाच्या आजी! मराठी सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम हिरिरीने राबवणाऱ्या अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा अनोखा व्हॅलेण्टाइन्स डे मंगळवारी कमलाबाई मुंढले यांच्या राहत्या घरी दहिसरला साजरा झाला.

शंभरी पार केलेली व्यक्ती साधारणपणे अंथरुणाला खिळून असते. चालता येत नाही, घरातली सोडा पण आपलीही कामे आपली आपण करता येत नाहीत, शरीरधर्मावर ताबा नसतो अशी साधारण प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर असते. पण १०७ वर्षांच्या कमलाबाई नऊवारी लुगडे नेसून टेचात चालत येत त्यांच्या घरातील सोफ्यावर बसतात तेव्हा दिनदíशकेची शेकडो पाने उलटून काळ मागे सरकल्यासारखे वाटते. अजूनही स्वत:च्या हाताने कप उचलून चहा पिणाऱ्या कमलाबाई यांना गोडाचा फार सोस! चहादेखील जास्त साखर टाकून, एवढेच कशाला जेवताना अगदी आमटी-भातावरही साखर घेतात. पण अजूनही मधुमेह, रक्तदाब वगरे कुरबुरी नाहीत. आता म्हातारपणामुळे डाव्या कानाने कमी ऐकू येते, एवढीच काय ती तक्रार!

कमलाबांईंच्या गोडाचा सोस एवढा की, मुळ्येकाकांनी नेलेल्या पेढय़ाच्या पुडय़ातील एक पेढा कोणाचेही लक्ष नसल्याचे बघून त्यांनी हळूच गट्टम केला आणि वर अविनाश नारकर यांनी आणलेली बर्फीही खाल्ली. आजही कमलाबाई भात, भाजी, आमटी, पोळी असे साग्रसंगीत जेवण घेतात.

दरवर्षी व्हॅलेण्टाइन्स डे रुग्णांबरोबर किंवा समाजातील दुर्लक्षित घटकांबरोबर साजरा करण्याचा पायंडा मुळ्येकाकांनी स्वत:पुरता पाडून घेतला आहे. पण यंदा या आजींची माहिती मिळाल्यावर यंदाचा हा दिवस त्यांच्याबरोबरच साजरा करायचा आणि जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती सोबत घेऊन जायची असे ठरवल्याचे मुळ्येकाकांनी सांगितले. त्यासाठी अविनाश आणि ऐश्वर्या नारकर या दोघांना विचारल्यावर हे सदाबहार जोडपे आनंदाने आजींना भेटायला तयार झाल्याचेही त्यांनी सांगितले.

कमलाआजींना भेटून खूपच सकारात्मक वाटले. १०७व्या वर्षीही आजी ज्या प्रकारे आयुष्य व्यतीत करत आहेत, त्यावरून खूप शिकण्यासारखे आहे. त्यांची ऊर्जा वाखाणण्याजोगी आहे. त्यांना बासुंदी आवडते, चांगले खायला आवडते. वास्तविक आम्हा दोघांनाही व्हॅलेण्टाइन्स डे वगरे संकल्पना पटत नाहीत, पण आजींना भेटून पाडगावकरांच्या ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या कवितेची आठवण झाली. खरेच खूप प्रेरणा मिळाली.

–  अविनाश व ऐश्वर्या नारकर