बळकट मराठीत गोडी ही लाख..

मराठी भाषेतील क ते ज्ञ या ३४ व्यंजनांचा उपयोग करून सर्वात लहान परंतु अर्थपूर्ण

लता दाभोळकर मुंबई | December 21, 2012 6:33 AM

क ते ज्ञ..
बळकट मराठीत गोडी ही लाख, ज्ञानभाषा वाढीच्या क्षुधाछंदी झुंजण्याची शपथ घ्या साफ.
मराठी भाषेतील क ते ज्ञ या ३४ व्यंजनांचा उपयोग करून सर्वात लहान परंतु अर्थपूर्ण वाक्य तयार करण्याचा जागतिक विक्रम पुण्याच्या मिलिंद शिंत्रे यांनी केला आहे.  इंग्लंडमधील रेकॉर्ड होल्डर रिपब्लिक, लंडन यांनी शिंत्रे यांच्या या नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
मिलिंद शिंत्रे यांनी विक्रमाबरोबरच विक्रमांची हॅट्ट्रिक साधून मराठी भाषेला जागतिक पातळीवर बहुमान मिळवून दिला आहे. त्यांनी यापूर्वी ‘प’ या अक्षरावरून अनुप्रास अलंकारात ‘पुष्पाचे प्राक्तन’ही मराठी भाषेत एकूण १७५० शब्दांची एक गोष्ट लिहिली आहे. ही गोष्ट जगातल्या सर्व भाषांमधील अनुप्रास अलंकारातील (या गोष्टीतील सर्वच्या सर्व शब्द प पासूनच सुरू होतात.) सर्वात मोठे उदाहरण आहे. त्याही जागतिक विक्रमाची नोंद त्यांच्या नावावर आहे. तसेच जगातील मराठी भाषेतील सर्वात मोठे म्हणजे तीन हजार सहाशे चौकटीचे कोडे तयार करण्याचा विक्रमही शिंत्रे यांच्या नावावर आहे.
मिलिंद शिंत्रे यांना या तिसऱ्या विक्रमाचा बहुमान मिळवून देणारे वाक्य आहे- ‘बळकट मराठीत गोडी ही लाख, ज्ञानभाषा वाढीच्या क्षुधाछंदी झुंजण्याची शपथ घ्या साफ’. ३४ व्यंजनांनी युक्त वाक्य तयार करताना मराठी भाषा बळकट आहे, तिची गोडी अवीट आहे आणि तिच्या समृद्धीसाठी आपण झटले पाहिजे, असा संदेश शिंत्रे यांनी दिला आहे.
असा विक्रम करण्याचे सुचले कसे, याविषयी सांगताना शिंत्रे म्हणाले की, माझ्या एका मित्राने इंग्रजीतील सर्व मुळाक्षरांचा वापर केलेले एक वाक्य असलेला एसएमएस पाठविला होता. तो वाचून मराठीतही आपण सर्व व्यंजनांनी युक्त वाक्य तयार करावं, असा विचार मनात डोकावला आणि त्यादृष्टीने विचार सुरू झाला. सुरुवातीला मी सर्व व्यंजनयुक्त वाक्य लिहिलं. परंतु त्यात ५२ अक्षरे होती. नंतर ही संख्या कमी करत ४२ वर आणली आणि मग ३४ व्यंजने व ३४ अक्षरे असलेले एक वाक्य तयार करण्याची किमया साधली आणि ते वाक्य मी ‘रेकॉर्ड होल्डर रिपब्लिक, लंडन’ यांच्याकडे पाठविले आणि आपल्या नावावरील विक्रमाची नोंद झाल्याचे त्यांनी कळविले. या विक्रमाची नोंद शिंत्रे यांच्यासाठी नावावर आहे, याचा त्यांना अभिमान आहेच; परंतु मराठी भाषेत अशा प्रकारचा विक्रम नोंदविल्याची नोंद जागतिक स्तरावर झाली, याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. अशा प्रकारच्या विक्रमांमुळे काही अंशी का होईल लोक मराठी भाषेकडे सकारात्मक दृष्टीने बघतील. तसेच मराठी माणसांनाही आपल्या भाषेविषयीचा न्यूनगंड कमी होण्यास मदत होईल. मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या प्रयत्नातला आपला हा खारीचा वाटा, त्यांना महत्त्वाचा वाटतो. चित्रपट, नाटक आणि मालिकांसाठी लेखन-दिग्दर्शन आणि अभिनय करणाऱ्या शिंत्रे यांना लहानपणापासूनच शब्दकोडे तयार करण्यात रस आहे. आता त्यांना जगातल्या सर्व भाषांमधलं सर्वात मोठं कोडं तयार करण्याचा मानस शिंत्रे यांनी बोलून दाखवला.

First Published on December 21, 2012 6:33 am

Web Title: valid marathi switness is lakh