ज्येष्ठ पत्रकार वसंत भालेकर यांचे मंगळवारी सकाळी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. सिने पत्रकारीतेत सक्रिय असलेले भालेकर ‘रसरंग’ साप्ताहीकाचे प्रमुख लेखक होते. तसेच ते क्रिडा क्षेत्राचेसुध्दा जाणकार होते. गेल्या सहा महिन्यापासून आजारी असलेले भालेकर आजारपणातून बाहेर येऊ शकले नाहीत. अखेर ८५ वर्षीय भालेकरांची आज सकाळी प्राणज्योत मावळली. मराठी चित्रपटसृष्टीतला त्यांचा वावर ही त्यांची खासियत होती. नेव्हीमधील नोकरी सांभाळून त्यांनी पत्रकारिता केली. सुलोचना, जयश्री गडकर, सिमा देव, रमेश देव, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारे यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ‘आठवणींची रिळं’, ‘सुपरहिट दादा’ आणि ‘कबड्डी महर्षी’ इत्यादी पुस्तकांचे लिखाण केलेल्या भालेकरांनी ‘अशी मी जयश्री’ या पुस्तकाचेदेखील लिखाण केले होते. चित्रपट आणि क्रिडा क्षेत्रातले अनेक किस्से सांगणारे भालेकरांचे व्यक्तिमत्व गपिष्ट होते. पत्रकार मुखस्तंभ नसून बोलका असावा हे त्यांचे मत होते, जे त्यांनी कायम पाळले. त्यांच्याकडे हिंदी आणि मराठी चित्रपटांचे भरपूर कलेक्शन होते. सी रामचंद्र आणि लक्ष्मिकांत प्यारेलाल यांच्या संगीताचे ते चाहते होते. लता मंगेशकरांशी घरोबा असलेले भालेकर प्रसिध्द विनोदी कलाकार दादा कोंडके यांचे खास मित्र होते. खोखो, कब्बडी आणि कुस्तीसारख्या देशी खेळात ते माहीर होते.