वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाचा निर्णय; दरदिवशी केवळ २५ हजार नागरिकांनाच प्रवेश

मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात हॅम्बोल्ट पेंग्विन पाहण्यासाठी तमाम मुंबईकर उद्यानात गर्दी करत आहेत. शनिवारी तर हा आकडा ४० हजारांवर पोहचला. वाढत्या गर्दीमुळे नागरिकांमध्ये भांडणेही होऊ लागली आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उद्यानाचे प्रवेशद्वार ३ वाजता बंद करण्यात येणार असून रोज केवळ २५ हजार नागरिकांनाच प्रवेश देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

हॅम्बोल्ट पेंग्विनने मुंबईतील वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतर त्यांचे दालन सामान्यांनासाठी खुले करण्यात आले. तमाम मुंबईकरांना पेंग्विन पाहता यावे यासाठी प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत दालनासाठी कोणतेही तिकिट न आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. यामुळे गेल्या काही दिवसांत उद्यानात मुंबईकरच एकच गर्दी करू लागले आहेत. गर्दीमुळे नागरिकांमध्ये भांडणे होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.

सर्वाना हॅम्बोल्ट पेग्विन पाहण्याचा आनंद लुटता यावा यासाठी मुंबईकर नागरिकांनी प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन त्रिपाठी यांनी केले. पुढील सुचना मिळेपर्यंत हे उद्यान सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत खुले राहणार असून दर बुधवारी साप्ताहिक सुट्टीनिमित्त उद्यान व प्राणीसंग्रहालय बंद राहील असेही प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले.

सुरक्षिततेच्या कारणास्तव सदर उद्यान व प्राणिसंग्रहालयचे मुख्य प्रवेश द्वार दुपारी ३ वाजता बंद करण्यात येईल तसेच पहिल्या २५ हजार नागरिकांनाच प्रवेश देण्यात येईल.    – डॉ. संजय त्रिपाठी, प्रभारी संचालक, उद्यान व प्राणीसंग्रहालय