घाऊक बाजारात भाज्यांच्या दरांचा चढता आलेख सुरू होताच किरकोळ विक्रेत्यांनी ग्राहकांची यथेच्छ लूट केली असून घाऊक बाजारात पन्नाशीच्या जवळपास पोहोचलेला टोमॅटो किरकोळ बाजारात थेट ८० ते १०० रुपये किलोने विकला जाऊ लागला आहे. उत्तम प्रतीचे आलं किरकोळ बाजारात १०० रुपयांच्या घरात पोहोचले असून कोथिंबिरीची मोठी जुडी ५० रुपयांनी विकली जात आहे. पावसाळा सुरू होताच ताज्या, हिरव्यागार भाज्यांची स्वस्ताई प्रत्यक्षात अवतरेल आणि महागाईचे चटके काहीसे कमी होतील, अशी आशा बाळगणाऱ्या मुंबईकर ग्राहकांपुढे भाज्यांचे दरवाढीचे संकट पुढील काही दिवस कायम राहण्याची चिन्हे आहेत.
आवक मंदावल्याने एपीएमसीच्या घाऊक बाजारात उत्तम प्रतीच्या कांद्याचे दर २७ रुपयांपर्यत स्थिरावले असले तरी किरकोळ बाजारात ते ४० रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. संपूर्ण जून महिन्यात पावसाने ओढ घेतल्यामुळे या पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ातील भाज्यांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम दिसू लागल्यामुळे घाऊक बाजारात ही दरवाढ सुरू आहे.
उत्तम प्रतीचा टॉमेटोचे दर शनिवापर्यंत ४० रुपये किलो असे होते. तीन दिवसांत त्यामध्ये वाढ होऊन आता ते ५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. घाऊक बाजारात चढय़ा दरांची चाहूल लागताच किरकोळ मंडयांमध्ये भेंडी, गवार, फरसबी, शेवगा शेंग, वांगी, फरसबी यांसारख्या प्रमुख भाज्यांचे दर ६० ते ८० रुपयांच्या घरात पोहोचले असून मुंबई, ठाणे, वाशीच्या काही बाजारांमध्ये उत्तम प्रतीचा टोमॅटो थेट १०० रुपयांनी विकला जात आहे. दुय्यम प्रतीच्या टोमॅटोसाठी ६० ते ८० रुपये मोजावे लागत असून आणखी काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची चिन्हे आहेत. हुबळीहून येणाऱ्या आल्याचा पुरवठाही कमी झाल्याने घाऊक बाजारात उत्तम प्रतीचे आलं ७० रुपयांनी विकले जात आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात आलं, कोथिंबार, मिरच्या असा हिरवा मसालाही महागला आहे.