गुरू आणि शुक्र हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ आले आहेत. त्यांच्यातील अंतर कमी झाले नसले तरी पृथ्वीवरून तो एकच मोठा तारा असल्यासारखे भासत आहे. पावसाचा जोर कमी असल्याने अनेक खगोलप्रेमींना या आकाशस्थ घटनेचा आनंद घेता येतोय. आणखी काही दिवस ही युती आकाशात पश्चिम दिशेला क्षितिजावर पाहता येईल. भारतीय वेळेनुसार बुधवारी सकाळी नऊ वाजता या दोन्ही ग्रहांमधील अंतर सर्वात कमी असेल. मात्र बुधवारी संध्याकाळीही त्याचे दर्शन घेता येईल. आकाशात अनेकदा ग्रह एकत्र येताना दिसतात. या घटना सातत्याने घडत असल्या तरी प्रत्येक घटना विशिष्ट क्रमाने किंवा अंतराने घडत नाही, असे नेहरू तारांगणाचे कार्यक्रम समन्वयक सुहास नाईक-साटम म्हणाले. या दोन्ही ग्रहातील अंतर एक तृतीयांश अंश एवढे कमी आहे. पृथ्वीवरून ग्रह पाहताना ते आपल्यापासून समान अंतरावर दिसतात. अशा ग्रहांमधील अंतर मोजण्यासाठी अंश या एककाचा वापर केला जातो.  सूर्य आणि चंद्र यांचा आकार हा अर्धा अंशाचा आहे. यापेक्षाही कमी अंतर गुरू व शुक्र या ग्रहांमध्ये आहे, असे खगोलअभ्यासक डॉ. अभय देशपांडे म्हणाले.