शुक्रवारी यशवंत नाटय़मंदिरात कार्यक्रम
सबंध आयुष्यभर नाटक हाच ज्यांचा श्वास आहे असे ज्येष्ठ रंगकर्मी आणि माजी नाटय़संमेलनाध्यक्ष अरुण काकडे यांना यंदाच्या ‘चैत्र-चाहुल’ कार्यक्रमात ‘ध्यास सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर सलग तिसरी पिढी नाटय़सेवा करणाऱ्या गोव्याच्या विजयकुमार नाईक यांना रंगकर्मी सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. डॉ. सरयू विनोद दोशी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
येत्या शुक्रवारी, ८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा येथे ‘चैत्र-चाहुल’चा हा वैविध्यपूर्ण मनोरंजनाची मेजवानी पेश करणारा कार्यक्रम होणार आहे. यावर्षी या कार्यक्रमाची संकल्पना आहे- जुगलबंदी! नाटय़, नृत्य, लावणी आणि वाद्ये यांच्यात ही जुगलबंदी रंगणार आहे. अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर, संजय मोने, आनंद इंगळे, अक्षत कोठारी, प्रमोद पवार, चिन्मयी सुमीत, तुषार दळवी, दीपाली विचारे, कमलेश भडकमकर, शर्वरी लोहकरे, पराग पुजारे, स्वप्नील भिसे, दीपक करंजीकर, नीरद राघवन, राहुल देव, रोहित प्रसाद आणि डॉ. गणेश चंदनशिवे व सहकारी या कलाकारांमध्ये ही जुगलबंदी रंगेल. या कार्यक्रमाची संकल्पना प्रदीप मुळ्ये यांची असून, दिग्दर्शन विजय केंकरे यांचे आहे.
या कार्यक्रमात काही जागा वाचक रसिकांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. मॅजेस्टिक बुक स्टॉल, शिवाजी मंदिर, दादर येथे कोणतेही मराठी पुस्तक खरेदी करणाऱ्यांस विनामूल्य प्रवेशिका मिळेल. या राखीव जागा मर्यादित असल्याने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार प्रवेश दिला जाईल, असे संयोजक महेंद्र पवार यांनी म्हटले आहे.