नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता तसेच डॉ. दिलीप म्हैसेकर यांची नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यपीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली.
राज्यपाल आणि कुलपती चे. विद्यासागर राव यांनी रविवारी निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर डॉ. म्हैसेकर यांचे नाव जाहीर केले. डॉ. म्हैसेकर यांची नियुक्ती पाच वर्षांच्या काळासाठी करण्यात आली आहे. डॉ. अरुण जामकर यांचा कार्यकाळ २० डिसेंबर रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर एकनाथ डवळे प्रभारी कुलगुरू म्हणून या पदाचा कार्यभार सांभाळीत होते. डॉ. म्हैसेकर यांनी १९८४मध्ये औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयातून एमबीबीएस ही पदवी मिळवली. यानंतर १९८९मध्ये मुंबईच्या जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयातून (क्षयरोग व छातीचे विकार) या विषयात एमडी केले. डॉ. म्हैसेकर यांना अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव असून त्यांचे संशोधन निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकाशनात प्रसिद्ध झाले आहेत.