सिंधुदुर्ग काँग्रेस समिती बरखास्त; विकास सावंत नवे जिल्हाध्यक्ष

भाजपच्या वाटेवर असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या सदस्यांचा स्वतंत्र गट म्हणून कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केल्याची चलाखी उघडकीस येताच काँग्रेस पक्षाने शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त करून अध्यक्षपदी राणे विरोधकाची नियुक्ती केली.

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त करण्यात आली असून, जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री भाई सावंत यांचे पूत्र विकास सावंत यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश पाटील यांनी केली. तालुका अध्यक्ष व अन्य नियुक्तया नंतर केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राणे यांची काँग्रेसवर कुरघोडी

गेल्या मार्च महिन्यात झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रसला बहुमत मिळाले. निवडणुकीनंतर राणे समर्थकांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांचा स्वतंत्र गट म्हणून कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली. परिणामी काँग्रेस पक्षाने लागू केलेला पक्षादेश या सदस्यांना लागू होणार नाही. तसेच राणे यांनी पक्षांतर केल्यावर हा गट त्यांच्याबरोबर जाऊ शकतो. ही बाब कोणाच्याच लक्षात आली नव्हती.

पुढील महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राणे यांनी काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून आपल्याच समर्थकांना पुढे करण्यास सुरुवात करताच त्याची प्रतिक्रिया उमटली. गेल्याच आठवडय़ात खासदार हुसेन दलवाई आणि प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्य़ांमध्ये बैठका घेतल्या. त्यावरून राणे संतप्त झाले.

राणे यांचे प्रताप उघड होताच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि खासदार हुसेन दलवाई यांनी ही बाब दिल्लीत निदर्शनास आणून दिली. राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राणे यांचे वर्चस्व असलेली सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती बरखास्त करण्यात आली. एक प्रकारे काँग्रेसने राणे यांना राजकीय धक्का दिला आहे. पण राणे यांनी जिल्हा परिषद सदस्यांची स्वतंत्र गट म्हणून नोंदणी केल्याने काँग्रेसची परिस्थिती अवघड झाली आहे. कारण राणे यांच्याबरोबर जाण्यास उत्सुक नसलेल्या काँग्रेस सदस्यांना या गटाचा आदेश पाळावा लागेल. अन्यथा त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ शकेल.

राणे आणि काँग्रेस यांच्यात आता संघर्ष सुरू झाला आहे. राणे भाजपमध्ये गेल्यास सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्य़ांमध्ये जास्त नुकसान होणार नाही या दृष्टीने हुसेन दलवाई यांनी निष्ठावान किंवा जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुर केल्या आहेत.