दुचाकीस्वाराच्या भावाने केलेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांना शहीदाचा दर्जा दिला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शिंदे यांचा मृत्यू दुर्दैवी असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

विलास शिंदे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळीतील पोलीस कॉलनीत जाऊन शिंदे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री कॉलनीत दाखल होताच पोलिसांच्या कुटुंबीयांच्या रोषाचा त्यांना सामना करावा लागला. पोलिसांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणाबाजी करत महिलांनी परिसर दणाणून सोडला. महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्नदेखील केला. आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणीही या महिलांनी केली.  शेवटी या घेरावातून मार्ग काढत  देवेंद्र फडणवीस यांनी विलास शिंदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.  शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन करुन बाहेर पडल्यावर फडणवीस यांनी आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. सरकार शिंदे कुटुंबीयांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिल असेही त्यांनी सांगितले. तर पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनीदेखील विलास शिंदे यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आम्ही शिंदे कुटुंबीयांसमवेत आहेत असे सांगितले.

दरम्यान, विलास शिंदे यांच्या निधनानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. खारमध्ये जिथे विलास शिंदेंवर हल्ला झाला तिथे जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. मनसे कार्यकर्त्यांनी चौकात लागलेल्या कुरेशी या फलकाची कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. विलास शिंदे अमर रहे अशी घोषणाबाजीही मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली.