मोलकरणीला मारहाण केल्याच्या आरोपावरून माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि त्यांच्या पत्नीविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पगाराची मागणी केल्यावरून कांबळी दाम्पत्याने घरकाम करणाऱ्या महिलेला मारहाण केली व तिला तीन दिवस एका खोलीत डांबून ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
सोनी सरसाल असे पीडित महिलेचे नाव आहे. ती गेली दोन वर्षे कांबळी यांच्या घरी काम करीत होती. कामाचे पैसे मागितल्यावरून त्यांच्यात भांडण झाले. या वेळी कांबळी यांनी सोनी हिच्या श्रीमुखात भडकावली, असे तक्रारीत म्हटले आहे. कांबळी दाम्पत्याविरोधात वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.