दक्षिण मुंबईमधील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा राबता असलेल्या रस्त्यांच्या साफसफाईची जबाबदारी खासगी स्वयंसेवी संस्थेवर सोपविण्यात आली आहे. झाडलोट करुन हे रस्त लख्ख करण्यासाठी महापालिकेने ५० स्वयंसेवकांची फौज सज्ज केली आहे. मात्र आता प्रशासनाने या कामासाठी निविदा मागविण्याची अट शिथील करण्यास परवानगी मिळावी असा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये सादर केला आहे.
नरिमन पॉइंट येथे मंत्रालय, विधानभवन असल्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा राबता असतो. काही ठराविक रस्त्यांवरुनच या मंडळींची जा-ये सुरू असते. त्यामुळे हे रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेची धडपड सुरू असते.
पालिकेचे सफाई कामगार सकाळच्या पाळीमध्ये या रस्त्यांची साफसफाई करतात. तर स्वामी समर्थ सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकांच्या मदतीने उर्वरित वेळेत सफाई करण्यात येते. या संस्थेचे ३४ स्वयंसेवक दुसऱ्या पाळीत, तर १६ स्वयंसेवक तिसऱ्या पाळीत सफाईचे काम करतात. ३ जानेवारी ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत संस्थेचे स्वयंसेवक या रस्त्यांवर राबत होते. या बदल्यात स्वयंसेवकाला प्रत्येकी ३३३ रुपये याप्रमाणे स्वामी समर्थ सामाजिक संस्थेला १४ लाख ६५ हजार २०० रुपये देण्यात येणार आहेत. मात्र निविदा न मागविताच हे काम या संस्थेला देण्यात आले आहे. त्यामुळे निविदा मागविण्याची अट शिथील करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती करणारा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे सादर केला आहे.
या संस्थेकडून २५ लाखांच्या मर्यादेत मॅनिंग-मॉपिंगचे काम करुन घेण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
महापालिकेतर्फे २६ रस्त्यांची निवड
 महापालिकेने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा राबता असलेले २६ रस्ते निश्चित केले असून त्यात भुलाभाई देसाई मार्ग, पेडर रोड, नेपीयन्सी रोड, बाबुलनाथ मार्ग, नेताजी सुभाषचंद्र रोड, वाळकेश्वर मार्ग, अल्टामाऊंट रोड, व्ही. पी. रोड आदी रस्त्यांच्या समावेश आहे. मॅनिंग मॉपिंग संकल्पनेद्वारे या रस्त्यांची स्वच्छता करण्यात येत आहे.