विशेष तपास पथकाची माहिती

अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडे याची कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणीही चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी त्याच्या कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) वतीने सोमवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आली. तसेच न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी ११ ऑगस्टपर्यंत तहकूब केली असून तोपर्यंत खटल्याला दिलेली अंतरिम स्थगितीही कायम राहील.

पानसरे हत्याप्रकरणी अटकेत असलेला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याच्याविरोधात कोल्हापूर सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पुंगळ्यांचा न्याय्यवैद्यक अहवाल अद्याप उपलब्ध न झाल्याने खटल्याला स्थगिती देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली होती. ती न्यायालयाने मान्य केली होती.

न्यायमूर्ती साधना जाधव यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळेस दाभोलकर, पानसरे आणि विचारवंत एम. एम. कलबुर्गी या तिघांच्या हत्येप्रकरणी समान दुवा आहे की नाही, असल्यास तो सिद्ध करण्यासाठी तावडेची कोठडी मागण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारी वकील संदीप शिंदे यांनी दिली. मात्र तिन्ही हत्या प्रकरणांमध्ये कुठलाही संबंध वा समान दुवा नसल्याचा दावा करीत गायकवाड याचे वकील संजीव पुनाळेकर यांनी त्याला तीव्र विरोध केला.